मोदींशी जवळचे संबंध असल्यानेच संभाजी भिडेंना अटक नाही का?; प्रकाश आंबेडकरांचा सवाल
By ऑनलाइन लोकमत | Published: March 22, 2018 04:18 PM2018-03-22T16:18:48+5:302018-03-22T16:28:39+5:30
कोरेगाव भीमामध्ये हिंसाचार भडकाविल्याच्या आरोपात एकाला (मिलिंद एकबोटे) अटक झाली पण एका व्यक्तीला (संभाजी भिडे) अजूनही अटक झाली नसल्याचं समाजाला पचत नाही
मुंबई- कोरेगाव भीमामध्ये हिंसाचार भडकाविल्याच्या आरोपात एकाला (मिलिंद एकबोटे) अटक झाली पण एका व्यक्तीला (संभाजी भिडे) अजूनही अटक झाली नसल्याचं समाजाला पचत नाही, असं वक्तव्य भारिप बहुजन महासंघाचे अध्यक्ष प्रकाश आंबडेकर यांनी केलं आहे. माणूस कुठल्याही विचारांचा असेल तरी त्याला अटक झाली पाहिजे. त्यांना अटक करण्यासाठी राजकीय इच्छाशक्ती नाही, असा थेट आरोप प्रकाश आंबेडकर यांनी केला. कोरेगाव भीमामधील दंगल ही घडवलेली दंगल होती, असंही प्रकाश आंबेडकर यांनी म्हंटलं. नरेंद्र मोदी यांच्याशी जवळचे संबंध असल्याने मुख्यमंत्र्याना तो इशारा गेलाय का ? असा सवालही प्रकाश आंबेडकर यांनी उपस्थित केला.
ज्यावेळी गुन्हा दाखल होतो. चार्जशीट दाखल होते. त्या माणसाला चौकशीला बोलावणे बंधनकारक. पण त्या व्यक्तीला चौकशीला बोलावले नाही, अशी टीकाही प्रकाश आंबेडकर यांनी केली आहे. मुंबईत बॅलार्ड पिअरला पक्ष कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये प्रकाश आंबेडकर बोलत होते.
पत्रकार परिषदेमध्ये बोलताना प्रकाश आंबेडकर यांनी अॅट्रॉसिटीबद्दलच्या सुप्रीम कोर्टाच्या निर्णयावरही सडकून टीका केली. अॅट्रॉसिटीबद्दल सुप्रीम कोर्टाने दिलेला निकाल दुर्देवी असून या निर्णयाचा पुर्नविचार व्हावा, अशी मागणी भारिप बहुजन महासंघाचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी केली आहे. कोर्टाचा अवमान कोर्टाने केला असून अॅट्रॉसिटी करणाऱ्याला अभय देण्याचं काम केल्याचंही त्यांनी म्हंटलं.
न्यायसंस्था एकमेकांवर विश्वास ठेवत नाही, असं चित्र दिसत असल्याचं ते म्हणाले. कोर्टाने असे निर्णय दिले तर त्यामुळे कोर्टावर असणार विश्वास कमी होईल, असंही प्रकाश आंबेडकर यांनी म्हंटलं. कोर्टाच्या निर्णयाचा लोकांकडून विरोध केला जातोय, ते टाळायचं असेल तर न्यायसंस्थेने अशा गोष्टी करू नये ज्यामुळे कायद्याला वेसण घालतील. असंही प्रकाश आंबेडकर म्हणाले.