'‘कोरेगाव भीमाशी ब्राम्हण महासंघाचा संबंध नाही''
By ऑनलाइन लोकमत | Published: January 5, 2018 08:18 PM2018-01-05T20:18:09+5:302018-01-05T20:20:03+5:30
कोरेगाव भीमा वादाच्या प्रकरणात अखिल भारतीय ब्राम्हण महासंघाचे जिल्हाध्यक्ष आनंद दवे यांच्यावर औरंगाबादे येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र, या वादाशी महासंघाचा काहीही संबंध नसून केवळ जातीय तेढ वाढविण्याचे हे षडयंत्र असल्याचा दावा महासंघाकडून करण्यात आला आहे.
पुणे : कोरेगाव भीमा वादाच्या प्रकरणात अखिल भारतीय ब्राम्हण महासंघाचे जिल्हाध्यक्ष आनंद दवे यांच्यावर औरंगाबादे येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र, या वादाशी महासंघाचा काहीही संबंध नसून केवळ जातीय तेढ वाढविण्याचे हे षडयंत्र असल्याचा दावा महासंघाकडून करण्यात आला आहे.
दवे यांच्यावर औरंगाबाद येथील पोलिस ठाण्यात विविध कलमांखाली गुन्हा दाखल झाला आहे. याप्रकरणी दवे व ब्राम्हण महासंघाचे प्रदेश कार्याध्यक्ष विश्वजित देशपांडे यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे आपली भुमिका स्पष्ट केली आहे. दवे किवां ब्राम्हण महासंघाचा या प्रकरणाशी काहीही संबंध नाही. याठिकाणी दवे किंवा महासंघाचा कोणताही कार्यकर्ता केलेला नाही. तसेच कोरेगाव भीमा येथील कार्यक्रमासंदर्भात कोणतीही भुमिका संघटनेने घेतलेली नाही. केवळ ब्राम्हण व्यक्तींवर गुन्हे दाखल करून जातीय तेढ वाढविण्याचे हे षडयंत्र असल्याचे या पत्रकात स्पष्ट करण्यात आले आहे.
दि. 31 डिसेंबर रोजी शनिवारवाड्यावर आयोजित एल्गार परिषदेविषयी आमची भुमिका पोलिसांकडे पत्राद्वारे मांडली होती. या कार्यक्रमात ब्राम्हण समाजाच्या विरोधात जातीय तेढ वाढवणारे वक्तव्य केले जाण्याची शक्यता होती. तसे वक्तव्य करण्यातही आले. आम्ही मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून कोरेगाव भीमा येथील घटनेची उच्चस्तरीय चौकशी करून दोषींना शासन करावे, खोटे गुन्हे दाखल करणा-यांवर तसेच जातीय द्वेष पसरवणारी चिथावणीखोर भाषणे केलेल्या वक्त्यांवर कारवाई करावी, अशी मागणी केली जाणार असल्याचे पत्रकात नमुद करण्यात आले आहे.