कोरेगाव भीमा दंगल: पुरवणी दोषारोपपत्रातही भिडे, एकबोटेंना वगळले
By ऑनलाइन लोकमत | Published: October 10, 2020 06:20 AM2020-10-10T06:20:11+5:302020-10-10T06:20:39+5:30
फादर स्टॅन स्वामी, प्रो. आनंद तेलतुंबडे, प्रो. हनी बाबू, गौतम नवलखा, मिलिंद तेलतुंबडे आणि कबीर कला मंचाचे कार्यकर्ते ज्योती जगताप, सागर गोरखे आणि रमेश गायचोर यांच्या नावांचा दोषारोपपत्रात समावेश आहे.
मुंबई : कोरेगाव भीमा दंगलप्रकरणी राष्ट्रीय तपास यंत्रणेने (एनआयए) शुक्रवारी आठ जणांविरुद्ध विशेष एनआयए न्यायालयात दुसरे पुरवणी दोषारोपपत्र सादर केले.
फादर स्टॅन स्वामी, प्रो. आनंद तेलतुंबडे, प्रो. हनी बाबू, गौतम नवलखा, मिलिंद तेलतुंबडे आणि कबीर कला मंचाचे कार्यकर्ते ज्योती जगताप, सागर गोरखे आणि रमेश गायचोर यांच्या नावांचा दोषारोपपत्रात समावेश आहे. मात्र, त्यात हिंदू एकता आघाडीचे मिलिंद एकबोटे आणि शिव प्रतिष्ठान हिंदुस्तानचे प्रमुख संभाजी भिडे गुरुजी यांच्या नावाचा समावेश नाही. एकबोटे आणि भिडे गुरुजी या दोघांवरही गुन्हा नोंदविण्यात आलेला आहे.
फादर स्टॅन स्वामी (८३) हे सामाजिक कार्यकर्ते असून, आदिवासी लोकांसाठी काम करतात. त्यांना गुरुवारीच एनआयएने रांचीहून अटक केली. शुक्रवारी त्यांना २३ आॅक्टोबरपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. गुरुवारी अटक केलेल्या स्टॅन स्वामीविरुद्धही दोषारोपपत्र दाखल केल्याची माहिती एनआयएच्या वकिलांनी दिली. कोरेगाव भीमा दंगल प्रकरणी एनआयएने पहिले दोषारोपपत्र नोव्हेंबर, २०१८ मध्ये विशेष न्यायालयात दाखल केले. त्यामध्ये सामाजिक कार्यकर्ते सुधीर ढवळे, अॅड. सुरेंद्र गडलिंग, डॉ. शोमा सेन, प्रा. रोना विल्सन आणि महेश राऊत यांच्या नावाचा समावेश होता.
त्यानंतर, फेब्रुवारी, २०१९ मध्ये पहिले पुरवणी दोषारोपपत्र दाखल करण्यात आले. कवी वरावरा राव, अॅड.सुधा भारद्वाज, सामाजिक कार्यकर्ते अरुण फेरारी आणि वेर्नोन गोन्साल्व्हिस यांच्या विरोधात हे दोषारोपपत्र होते.
फादर स्टॅन स्वामींना अटक
कोरेगाव-भीमा हिंसाचारप्रकरणी फादर स्टॅन स्वामी (वय ८३) या जेसुइट धर्मगुरूना गुरुवारी एनआयएने अटक केली. आदिवासींसाठी काम करणारे स्वामी हे बंदी घातलेल्या सीपीआय माओअिस्ट या संघटनेचे सदस्य आहेत, असा दावा एनआयएने केला आहे. - सविस्तर वृत्त/ देश-परदेश