कोरेगाव भीमा हिंसाचार प्रकरण: 'सरकार हटविण्यासाठी आरोपींनी दलित समाजाला एकत्र केले'

By ऑनलाइन लोकमत | Published: March 14, 2019 06:05 AM2019-03-14T06:05:39+5:302019-03-14T06:06:01+5:30

पुणे पोलिसांचा प्रतिज्ञापत्राद्वारे उच्च न्यायालयात दावा

Koregaon Bhima Violence Case: The accused brought together Dalit community to remove the government | कोरेगाव भीमा हिंसाचार प्रकरण: 'सरकार हटविण्यासाठी आरोपींनी दलित समाजाला एकत्र केले'

कोरेगाव भीमा हिंसाचार प्रकरण: 'सरकार हटविण्यासाठी आरोपींनी दलित समाजाला एकत्र केले'

Next

मुंबई : सरकारला हटविण्याचा माओवाद्यांचा हेतू साध्य करण्यासाठी आरोपी कार्यकर्त्यांनी दलित समाजाला चिथावले, असा दावा पुणे पोलिसांनी उच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्राद्वारे केला आहे.

कोरेगाव भीमा हिंसाचारप्रकरणी आरोपी असलेले अरुण फरेरा यांच्या जामीन अर्जाला विरोध करताना पुण्याचे साहाय्यक आयुक्त शिवाजी पवार यांनी उच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्र सादर केले. फरेरा यांच्यासह वर्नोन गोन्साल्विस, सुधा भारद्वाज, पी. वरावरा राव, गौतम नवलखा आणि आनंद तेलतुंबडे यांनाही या प्रकरणी आरोपी केले आहे. फरेरा आणि गोन्साल्विस यांच्या जामीन अर्जावरील सुनावणी न्या. पी. एन. देशमुख यांच्या एकसदस्यीय खंडपीठापुढे झाली. या याचिकांवरील सुनावणी ५ एप्रिलपर्यंत तहकूब करण्यात आली आहे.
प्रतिज्ञापत्रानुसार, फरेरा आणि अन्य आरोपी बंदी घातलेल्या सीपीआयचे (माओवादी) वरिष्ठ सदस्य आहेत. कायद्याने स्थापित केलेले सरकार हटविण्यासाठी प्रतिबंधित कारवाया करण्यासाठी ते पाठिंबा देतात. सीपीआयला सत्ता हवी आहे आणि ती मिळविणे, हाच त्यांचा उद्देश आहे, हे चौकशीत निष्पन्न झाले.

हेतू साध्य करण्यासाठी संघटनेने जुन्या पारंपरिक पद्धतीने युद्ध छेडले नाही; तर लोकांना एकत्र आणून त्यांना चिथावणी देऊन युद्ध छेडले. दलितांच्या स्वाभिमानासाठी, भेदभाव, उच्चभ्रूंकडून होणारे शारीरिक हल्ले या मुद्द्यांवरून सीपीआय त्यांना एकत्र आणून उद्दिष्ट साध्य करू पाहात आहेत, असे प्रतिज्ञापत्रात म्हटले आहे.

३१ डिसेंबर २०१७ च्या एल्गार परिषदेत फरेरा आणि अन्य आरोपींनी भावना भडकाविणारे भाषण केले. यावेळी दलित समाज मोठ्या प्रमाणावर सहभागी होता. सीपीआयने या परिषदेसाठी निधी पुरविला, असा दावा पोलिसांनी केला आहे. धर्म, जातीच्या नावाखाली लोकांमध्ये तेढ निर्माण करण्यासाठी फरेरा व अन्य आरोपींनी एल्गार परिषदेत लोकांमध्ये पॅम्पलेट वाटली. एल्गार परिषदेत दिलेल्या भाषणांचे फलित म्हणजे १ जानेवारी २०१८ चा कोरेगाव भीमा हिंसाचार आहे, असे पोलिसांनी प्रतिज्ञापत्रात म्हटले आहे. काही महत्त्वाच्या कागदपत्रांवरून, आरोपींच्या घरातून जमा केलेल्या पुराव्यांवरून आरोपी फौजदारी कटात सहभागी असून घडलेल्या गुन्ह्यात त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावल्याचा दावा पोलिसांनी न्यायालयात केला.

‘दहशत निर्माण करणे हेच ध्येय’
काही सक्रिय सदस्यांनी या दलित वर्गाला पद्धतशीर एकत्र आणले. फरेरा, गोन्साल्विस सीपीआयचे वरिष्ठ सदस्य आहेत आणि नवीन सदस्यांना भरती करण्याचे काम या दोघांवर आहे. हिंसाचार करून, समाजात तेढ निर्माण करून केंद्र व राज्य सरकारला हटविण्याचे सीपीआयचे उद्दिष्ट आहे. महत्त्वाच्या व्यक्तींची हत्या करणे, दहशत निर्माण करणे, हे संघटनेचे ध्येय आहे,’ असे प्रतिज्ञापत्रात म्हटले आहे.

Web Title: Koregaon Bhima Violence Case: The accused brought together Dalit community to remove the government

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.