सांगलीत गृहराज्यमंत्र्यांसमोर कोथळे कुटुंबियांचा आत्मदहनाचा इशारा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 12, 2017 11:23 PM2017-11-12T23:23:07+5:302017-11-12T23:40:57+5:30
अनिकेतच्या खून प्रकरणात आम्ही केलेल्या मागण्या मान्य न केल्यास कुटुंबासह आत्मदहन केले जाईल, असा इशारा अनिकेतच्या कुटुंबाने रविवारी गृहराज्यमंत्री दीपक केसरकर यांना दिला. पोलिस कोठडीत खून झालेल्या अनिकेत कोथळे याच्या कुटुंबीयांचे सांत्वन करण्यासाठी केसरकर रविवारी सांगलीत दाखल झाले.
सांगली : अनिकेतच्या खून प्रकरणात आम्ही केलेल्या मागण्या मान्य न केल्यास कुटुंबासह आत्मदहन केले जाईल, असा इशारा अनिकेतच्या कुटुंबाने रविवारी गृहराज्यमंत्री दीपक केसरकर यांना दिला.
पोलिस कोठडीत खून झालेल्या अनिकेत कोथळे याच्या कुटुंबीयांचे सांत्वन करण्यासाठी केसरकर रविवारी सायंकाळी सांगलीत दाखल झाले. त्यांनी या कुटुंबाच्या घरी भेट दिली. यादरम्यान नातेवाईकांनी पोलिसांबद्दल तीव्र संताप व्यक्त केला.
आरोपींना फाशीचीच शिक्षा झाली पाहिजे. अनिकेत कोथळे हत्या प्रकरणाचा तपास करणारी सीआयडीची यंत्रणा ही पोलिस दलातीलच आहे. त्यामुळे त्यांच्या तपासावर आमचा विश्वास नाही. यासाठी हा तपास सीबीआयकडे सोपविण्यात यावा. अजूनही पोलिसांनी आमची फिर्याद नोंदवून घेतलेली नाही.
आमच्या मागण्या मान्य न केल्यास कुटुंबासह आत्मदहन करु, असा इशारा त्यांनी दिला. यावर केसरकर यांनी, याचा तपास सीबीआयकडे देण्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांशी चर्चा करुन निर्णय घेतला जाईल, तुम्हाला शासनाकडून मदत देण्यासाठी प्रयत्न केले जातील, असे आश्वासन दिले.
आमदार सुधीर गाडगीळ, आमदार अनिल बाबर, शेखर माने, आनंदराव पवार, संजय विभुते, पृथ्वीराज पवार, गौतम पवार, जिल्हा पोलिसप्रमुख दत्तात्रय शिंदे, अतिरिक्त जिल्हा पोलिसप्रमुख शशिकांत बोराटे, उपअधीक्षक धीरज पाटील, निरीक्षक रवींद्र शेळके यावेळी उपस्थित होते. यावेळी अनिकेतच्या घरासमोर प्रचंड गर्दी झाली होती.
आम्हाला संरक्षण द्या : भंडारेच्या आईची मागणी
कवलापूरच्या अभियंत्यास लुबाडल्याप्रकरणी अनिकेतसोबत अमोल भंडारे यालाही अटक केली होती. भंडारेसमोरच अनिकेतचा खून झाला आहे. भंडारे सध्या न्यायालयीन कोठडीत आहे. आज ना उद्या तो जामिनावर बाहेर येईल. माझ्या मुलास तसेच मला व माझ्या दिरास अटकेत असलेल्या कामटेसह अन्य आरोपींच्या नातेवाईकांकडून धोका असून, आम्हाला पोलिस संरक्षण द्यावे, अशी मागणी भंडारेची आई रेखा यांनी गृहराज्यमंत्री दीपक केसरकर यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. माझ्या मुलास आता कोणी नोकरी देणार नाही. त्यामुळे त्याला सरकारी नोकरी द्यावी, अशीही मागणी त्यांनी केली आहे.