कोतवालचे सुपुत्र दिलीप शिंदे शहीद
By admin | Published: October 5, 2015 02:31 AM2015-10-05T02:31:07+5:302015-10-05T02:31:07+5:30
नरवीर तानाजी मालुसरे यांचा लढवय्यांचा तालुका म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पोलादपूर तालुक्याच्या शहीद परंपरेत कोतवालचे सुपुत्र दिलीप नारायण शिंदे
पोलादपूर : नरवीर तानाजी मालुसरे यांचा लढवय्यांचा तालुका म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पोलादपूर तालुक्याच्या शहीद परंपरेत कोतवालचे सुपुत्र दिलीप नारायण शिंदे यांचाही समावेश झाला आहे. शनिवारी सायंकाळी नेपाळ सीमेवर देशसेवेत असताना झालेल्या अपघातात दिलीप शिंदे यांना वीरगती प्राप्त झाली. तालुक्यातील आतापर्यंतचे ते १५वे शहीद ठरले आहेत.
कोतवाल रेववाडी येथील दिलीप नारायण शिंदे यांचे वडील नारायण शिंदे यांनी भारतीय सैन्यामध्ये देशसेवा केल्यानंतर दिलीप शिंदेदेखील वडिलांच्या आदर्शानुसार भारतीय सैन्यात भरती झाले. त्यांच्यावर २३ मराठा इन्फ्रंट्री बेळगाव सेंटरमधून नेपाळ सीमा भागात सीमा संरक्षणाची जबाबदारी होती. शनिवारी नेपाळ सीमेवर सेवा बजाविताना त्यांच्या लष्करी वाहनाला झालेल्या अपघातात त्यांना वीरगती प्राप्त झाली आहे. सोमवारी दिलीप नारायण शिंदे यांचे पार्थिव पोलादपूर तालुक्यातील त्यांच्या कोतवाल रेववाडी येथील निवासस्थानी लष्करी इतमामात अंत्यसंस्कारासाठी आणले जाणार आहे.
३२वर्षीय दिलीप यांनी वडील नारायण शिंदे यांच्या मृत्यूनंतर १० वर्षे भारतीय सैन्यात सेवा केली. त्यांनी विविध खेळांमध्ये प्रावीण्य प्राप्त करण्यासोबत पर्यावरण संवर्धन
आणि निसर्गाच्या जोपासनेचा
संदेश पोहोचविण्यासाठी सायकल भ्रमणही केले. त्यांच्या पश्चात आई चंद्राबाई शिंदे, पत्नी उज्ज्वला
शिंदे, भाऊ दीपक व सुरेश, बहीण ललिता असा परिवार आहे. त्यांचे दोघे भाऊ कोतवाल खुर्द येथे शेतकरी असून, कुटुंबाचा उदरनिर्वाह शेतीवर चालतो. (वार्ताहर)