कोविंद दलित असले तरी संघवादी
By admin | Published: June 20, 2017 01:49 AM2017-06-20T01:49:40+5:302017-06-20T01:49:40+5:30
राष्ट्रपतिपदासाठी सत्ताधारी भाजपाने जाहीर कलेले उमेदवार रामनाथ कोविंद हे दलित असले, तरी त्यांची सर्व पृष्ठभूमी ही राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला : राष्ट्रपतिपदासाठी सत्ताधारी भाजपाने जाहीर कलेले उमेदवार रामनाथ कोविंद हे दलित असले, तरी त्यांची सर्व पृष्ठभूमी ही राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची आहे. त्यामुळे संघवादी उमेदवाराला समर्थन देण्याचा प्रश्नच येत नाही. ते संघवादी आहेत, तर आम्ही संविधानवादी; त्यामुळे विरोधी पक्ष आता कोणता उमेदवार देणार, याकडे लक्ष असल्याची प्रतिक्रिया भारिप-बमसंचे संस्थापक अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी ‘लोकमत’ शी बोलताना दिली.
राष्ट्रपतिपदासाठी आदिवासी समाजाचा उमेदवार द्यावा, असा प्रस्ताव अॅड. आंबेडकर यांनी सत्ताधारी पक्षाने गठित केलेल्या त्रिसदस्यीय समितीकडे दिला होता. या संदर्भात त्यांनी अकोला येथे आयोजित पत्रकार परिषदेत आपली भूमिका स्पष्ट केली होती. आदिवासी समाज हा अजूनही विकासाच्या मुख्य प्रवाहापासून दूर आहे. इतर समाजानेच त्यांच्या कार्यक्षेत्रावर अतिक्रमण केले असले, तरी या समाजाला हक्क व अधिकारांपासून वंचित ठेवले आहे, त्यामुळे राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीच्या निमित्ताने या समाजाला मानाचे स्थान देण्याची संधी सर्वच राजकीय पक्षांना असल्याचे ते म्हणाले होते. आमच्याकडे एक मत म्हणजे, ३०२ मतांचे मूल्य आहे. त्यामुळे आम्हाला मत व्यक्त करण्याचा नक्कीच अधिकार आहे. आम्ही संविधानवादी आहोत, संघ विचारधारेवर विश्वास व श्रद्धा ठेवणारे संघवादी व संविधानवादी यामध्ये कसे जमणार, असा सवाल अॅड. आंबेडकर यांनी केला.