कृष्णा घोडा होते ‘पॉलिटिकल टायमिंग मास्टर’
By Admin | Published: May 25, 2015 03:37 AM2015-05-25T03:37:40+5:302015-05-25T03:37:40+5:30
आमदार कृष्णा घोडा यांनी आपल्या राजकीय प्रवासात तिसऱ्यांदा आमदारकी मिळविली होती. ‘पॉलिटिकल टायमिंग मास्टर’असा त्यांचा लौकिक होता.
डहाणू : आमदार कृष्णा घोडा यांनी आपल्या राजकीय प्रवासात तिसऱ्यांदा आमदारकी मिळविली होती. ‘पॉलिटिकल टायमिंग मास्टर’असा त्यांचा लौकिक होता.
काँग्रेसमधून राष्ट्रवादी वेगळी झाली तेव्हा त्यांनी पवारांसोबत राहणे पसंत केले आणि १९९९च्या निवडणुकीत त्यांनी डहाणूतून राष्ट्रवादीची उमेदवारी मिळविली. असेच टायमिंग त्यांनी २०१४ च्या निवडणुकीत दाखविले आणि अर्ज भरण्यास काही दिवस बाकी असताना त्यांनी राष्ट्रवादीची साथ सोडून शिवसेनेत प्रवेश केला होता. त्यांनी तत्कालीन राज्यमंत्री राजेंद्र गावित यांचा पराभव करून डहाणूची आमदारकी प्रथमच शिवसेनेला मिळवून दिली होती. जिल्हा बँकेच्या निवडणुकीनंतर अध्यक्ष, उपाध्यक्ष निवडीच्या ऐनवेळी ते सत्ताधारी सर्वपक्षीय सहकार पॅनलमध्ये दाखल झाले व त्यांनी उपाध्यक्षपद मिळविले होते.
कृष्णा घोडा यांच्या राजकीय कारकिर्दीची सुरु वात जंगल कामगार सोसायटीच्या माध्यमातून माजी आमदार भाईसाहेब कडू यांच्या मार्गदर्शनाखाली झाली. सर्वप्रथम रानशेत ग्रामपंचायतीचे ते सरपंच झाले. त्यानंतर १९९१ ते १९९६ पर्यंत डहाणू पंचायत समितीचे सभापतिपद त्यांनी सलग भूषविले.
१९९८ साली घोडा हे राष्ट्रवादीत गेले. त्यांना राष्ट्रवादीची डहाणूची उमेदवारी मिळाली. ते १९९९ साली प्रथम डहाणूचे आमदार झाले. २००४ मध्ये ते दुसऱ्यांदा आमदार झाले. मात्र २००९साली विधानसभेच्या मतदारसंघांची पुनर्रचना झाली आणि कृष्णा घोडा यांना मार्क्सवादीच्या राजाराम ओझरे यांच्याकडून पराभव पत्करावा लागला.
या पराभवाने खचून न जाता त्यांनी पुन्हा राजकीय कार्याला सुरु वात करून २०१४ च्या विधानसभा निवडणुकीपूर्वी त्यांनी शिवसेनेत प्रवेश करून पालघरची उमेदवारी मिळवली. पालघर विधानसभेचे आमदार होताना त्यांनी माजी राज्यमंत्री राजेंद्र गावित यांचा ५१५ मतांनी पराभव केला. नुकत्याच झालेल्या ठाणे जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीत त्यांना तीन दिवसांपूर्वी उपाध्यक्ष पदही लाभले होते.
आतापर्यंत त्यानी विविध सामाजिक संस्थांतील पदे भूषविली असून, ठाणे शिक्षण प्रसारक मंडळाचे ते विद्यमान अध्यक्ष होते, तर रानशेत येथे त्यांनी सुरू केलेल्या अनुसया कॉलेजचे ते संस्थापक होते. अनुसूचित जाती-जमाती कल्याण समितीचे त्यांनी सतत १० वर्षे अध्यक्षपद भूषविले होते. काँग्रेसनंतर राष्ट्रवादी, मग शिवसेना असा त्यांचा राजकीय प्रवास होता. त्यांनी आपल्या राजकीय कारकिर्दीत मोठा चाहता वर्ग निर्माण केला. (प्रतिनिधी)