आदिवासींचा 'काष्टा-लंगोट' मोर्चा
By admin | Published: July 29, 2016 07:37 PM2016-07-29T19:37:47+5:302016-07-29T19:37:47+5:30
मुंबई शहराच्या विकास नियोजन आराखड्यात येथील २२२ आदिवासी पाड्यांची नोंद करावी, म्हणून श्रमजीवी संघटनेने शुक्रवारी बोरीवली राष्ट्रीय उद्यानहून आदिवासींचा काष्टा-लंगोट मोर्चा काढला
ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. २९ : मुंबई शहराच्या विकास नियोजन आराखड्यात येथील २२२ आदिवासी पाड्यांची नोंद करावी, म्हणून श्रमजीवी संघटनेने शुक्रवारी बोरीवली राष्ट्रीय उद्यानहून आदिवासींचा काष्टा-लंगोट मोर्चा काढला. पारंपारिक वेशभूषेत सामील झालेल्या आदिवासींमुळे या मोर्चाने सर्वांचेच लक्ष वेधले.
यावेली श्रमजीवी संघटनेचे अध्यक्ष विवेक पंडित म्हणाले की, मुंबईमधील कोळी समाजाप्रमाणे येथील आदिवासीही मुंबईचे भूमिपुत्र आहेत. आदिवासी पाड्याच्या जमिनींचे भाव गगनाला भिडले आहेत. त्यांच्या जमिनींवर बिल्डर लॉबीचा डोळा असून, याच कारणास्तव आदिवासी पाड्यांना विकास आराखड्यात बगल देण्यात आली. शासनाने यापुढेही आदिवासी पाड्यांची नोंद विकास आराखड्यात केली नाही, तर आणखी तीव्र संघर्ष करण्याचा इशारा त्यांनी दिला आहे.
कांदिवलीच्या टाटा पॉवर येथे पोलिसांनी मोर्चा रोखत, श्रमजीवीच्या शिष्टमंडळाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत चर्चेला पाठवले. या शिष्टमंडळात श्रमजीवी संघटनेचे अध्यक्ष विवेक पंडित, संघटनेचे नेते बाळाराम भोईर, विजय जाधव , नलिनी बुजड यांचा समावेश होता. मुख्यमंत्र्यांनी शिष्टमंडळाचे म्हणणे ऐकून घेत, प्रवीण परदेशी आणि संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना मुंबईतील आदिवासी पाड्यांचा नवीन विकास नियोजन आराखड्यात समावेश करून घेण्याचे निर्देश दिले आहेत.