क्षीरसागरांनी गड राखला

By Admin | Published: June 13, 2016 11:17 PM2016-06-13T23:17:23+5:302016-06-13T23:21:09+5:30

बीड : येथील कृषी उत्पन्न बाजार समिती संचालकपदाच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसने सोमवारी जोरदार मुसंडी मारली. शिवसेना, भाजप, शिवसंग्राम, रासप, रिपाइं

Kshirsagar has kept the fort | क्षीरसागरांनी गड राखला

क्षीरसागरांनी गड राखला

googlenewsNext

महाआघाडीचा सफाया : कृउबा निवडणुकीत घड्याळाचा गजर; सर्वच जागांवर दणदणीत विजय
बीड : येथील कृषी उत्पन्न बाजार समिती संचालकपदाच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसने सोमवारी जोरदार मुसंडी मारली. शिवसेना, भाजप, शिवसंग्राम, रासप, रिपाइं व तीन माजी आमदारांनी एकत्र येऊन महाआघाडीची मोट बांधली होती; परंतु आ. जयदत्त क्षीरसागरांपुढे त्यांचा निभाव लागला नाही. महाआघाडीला भोपळाही फोडता आला नाही. सर्वच्या सर्व १८ जागा जिंकून क्षीरसागरांनी बाजार समितीचा गड तर अभेद्य राखलाच शिवाय बीड मतदारसंघात आपला दबदबाही कायम ठेवला.
२५ वर्षांपासून क्षीरसागरांचे वर्चस्व असलेल्या बाजार समितीतील सत्तेला सुरूंग लावण्यासाठी विरोधक एकवटले होते. महाआघाडीच्या माध्यमातून त्यांनी क्षीरसागरांना लक्ष्य करण्याचा प्रयत्न केला. वैयक्तिक आरोप-प्रत्यारोपांनी ही निवडणूक प्रतिष्ठेची बनली होती. संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागलेल्या या निवडणुकीसाठी रविवारी १७ केंद्रांवर मतदानाची प्रक्रिया पार पडली. तीन हजार २०८ पैकी तीन हजार १२९ मतदारांनी हक्क बजावला होता. सोमवारी सकाळी ८ वाजेपासून बार्शी रोडवरील मजूर फेडरेशनच्या कार्यालयात मतमोजणीला प्रारंभ झाला. सेवा सहकारी संस्था, ग्रामपंचायत व हमाल-मापाडी गटातील सर्वच जागांवर राकाँ पुरस्कृत शेतकरी विकास आघाडीने विजयाची मोहोर उमटवली.
दुसरीकडे महाआघाडीच्या परिवर्तन पॅनलला साधे खातेही खोलता आले नाही. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून विकास जगदाळे यांनी काम पाहिले. विजयाची घोषणा होताच राकाँ कार्यकर्त्यांनी जल्लोष केला. गुलाल उधळून कार्यकर्त्यांची मिरवणूक आ. क्षीरसागर यांच्या निवासस्थानी दाखल झाली. तेथे आ. क्षीरसागर यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. यावेळी माजी आ. सय्यद सलीम, माजी मंत्री बदामराव पंडित, रवींद्र क्षीरसागर, राकाँ जिल्हाध्यक्ष डॉ. भारतभूषण क्षीरसागर, जि. प. सभापती संदीप क्षीरसागर, गंगाधर घुमरे, अ‍ॅड. डी. बी. बागल, भारत सोन्नर, पवन तांदळे, शाहेद पटेल आदी उपस्थित होते.
तथापि, कृउबा निवडणुकीत व्यापारी मतदारसंघातून बबनराव गोरे, राधेश्याम कासट हे राकाँचे उमेदवार बिनविरोध निवडून आले होते. व्यापारी मतदार संघात घेतलेली आघाडी क्षीरसागरांनी शेवटपर्यंत कायम राखत विरोधकांना चारीमुंड्या चीत केले. क्षीरसागर गटाच्या सर्व उमेदवारांनी मोठ्या फरकांनी विजयाचा गुलाल लावला.
पराभवाची चिन्हे दिसताच
काढता पाय
सेवा सोसायटी मतदार संघातील निकाल बाहेर आले आणि कृउबामध्ये आ. क्षीरसागरांचीच सत्ता अबाधित राहिल्याचे चित्र स्पष्ट होऊ लागले. त्यामुळे मतमोजणीस्थळी निकाल ऐकण्यासाठी आलेल्या शिवसेना, भाजप, शिवसंग्रामचे पदाधिकाऱ्यांनी एकापाठोपाठ एक काढता पाय घेतला. (प्रतिनिधी)
यांची वर्णी : मोठ्या फरकाने नोंदवला विजय
सेवा सहकारी संस्था सर्वसाधारण : दिनकर कदम (१०९४ मते), गंगाधर घुमरे (१०४४), अरूण डाके (१०७७), गणपत डोईफोडे (१०७१), अच्युत मोरे (१०७०), शिवाजी येडे (१०६०), शेख हबीब शेख महेबूब (१०३८)
सेवा सहकारी संस्था महिला : सिंधू अरबने (११२९), सुमित्रा घोडके (११३४)
सेवा सहकारी संस्था इ. मा. व. : भीमराव काळे (११६८), अनिरूद्ध निर्मळ (११४५)
ग्रामपंचायत सर्वसाधारण : बळीराम गाडे (८७५), परमेश्वर सातपुते (८८८)
ग्रामपंचायत अनुसूचित जाती-जमाती : प्रमिला सोनवणे (८९७)
ग्रामपंचायत दुर्बल घटक : स्वाती बोबडे (८९७)
हमाल-मापाडी मतदारसंघ : हनुमान जगताप (११५)

Web Title: Kshirsagar has kept the fort

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.