Uddhav Thackeray: 'कुछ नही होता यार' हे अजिबात चालणार नाही; मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी बजावलं

By ऑनलाइन लोकमत | Published: November 28, 2021 09:27 PM2021-11-28T21:27:30+5:302021-11-28T21:27:52+5:30

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी लसीचे दोन्ही डोस प्रत्येकाने घेणे, विशेषतः विमानतळावरून येणाऱ्या आंतरराष्ट्रीय व देशांतर्गत प्रवाशांची काटेकोर चाचणी करणे यादृष्टीने आज जिल्हाधिकाऱ्यांना निर्देश दिले

'Kuch nahi hota yaar' CM Uddhav Thackeray cautious words over Omicron Corona's New Variant | Uddhav Thackeray: 'कुछ नही होता यार' हे अजिबात चालणार नाही; मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी बजावलं

Uddhav Thackeray: 'कुछ नही होता यार' हे अजिबात चालणार नाही; मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी बजावलं

Next

मुंबई - कोविडच्या दोन्ही लाटांचा आपण चांगला मुकाबला केला आहे, मात्र आता या विषाणूच्या ओमायक्रॉन व्हेरिएंटचे आव्हान चिंता वाढवणारे असून याची घातकता लक्षात घेता कोणत्याही परिस्थितीत संसर्ग वाढू नये म्हणून मुंबईसह सर्व जिल्ह्यांच्या प्रशासनाने अतिशय काळजी घ्यावी. परत एकदा संसर्गाचा वाढ झाली तर लॉकडाऊनसारखे पाऊल परवडणारे नाही. त्यामुळे परत लॉकडाऊन लागू द्यायचा नाही या निर्धाराने नियमित मास्क वापरणे, अनावश्यक गर्दी न करणे, सुरक्षित अंतर पाळणे अशी काही बंधने पाळावीत लागतील असं आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी राज्यातील जनतेला केले आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी लसीचे दोन्ही डोस प्रत्येकाने घेणे, विशेषतः विमानतळावरून येणाऱ्या आंतरराष्ट्रीय व देशांतर्गत प्रवाशांची काटेकोर चाचणी करणे यादृष्टीने आज जिल्हाधिकाऱ्यांना निर्देश दिले. यासंदर्भात केंद्राकडून येणाऱ्या सूचनांची वाट न पाहता युद्धपातळीवर जे जे गरजेचे वाटते ते निर्णय घेऊन आवश्यक पाऊले लगेच टाकावीत असेही त्यांनी स्पष्ट केले. आपल्या सर्वांमधीलच बेसावधपणा वाढला आहे. "कुछ नही होता यार" असा पवित्रा मोठ्या संकटात टाकू शकतो असे सावधगिरीचे बोल सांगत मास्क न वापरणे आणि नियम तोडून अनावश्यक गर्दी करणे यावर काटेकोर कारवाई झालीच पाहिजे असा आदेशच अधिकाऱ्यांना दिला.  

ऑक्सिजन, औषध उपलब्धता तपासा, अग्निसुरक्षा ऑडिट पूर्ण करा 

नवा व्हेरिएंट हा उंबरठा ओलांडून आला आहे का हे काळजीपूर्वक पाहावे लागेल. दोन्ही लाटांमध्ये आपल्याला कुठं कमी पडलो ते कळत होते. ऑक्सिजनचा साठा वाढविण्यासाठी धावपळ करावी लागली होती. त्यामुळे आता या नव्या विषाणू प्रकारामुळे शहरे असो किंवा दुर्गम भागातली रुग्णालये असोत, आपल्याला ऑक्सिजन निर्मिती, ऑक्सिजन साठा, आगीच्या घटना घडू नयेत म्ह्णून अग्निसुरक्षा तसेच स्थापत्य विषयक ऑडिट, औषधांची उपलब्धता हे सर्व प्रत्येक जिल्हा प्रशासनाने जातीने पाहावे. 

मास्क आवश्यकच, अनावश्यक गर्दी होऊ देऊ नका

महाराष्ट्रातील जनता समजूतदार आहे. यापूर्वीही सरकारच्या सर्व सूचनांचे पालन त्यांनी केले आहे. कोविडचे रुग्ण कमी झाल्यामुळे लोकांमध्ये बेसावधपणा आला आहे. या विषाणूशी कसे लढायचे , कोणते उपचार करावेत हा नंतरचा भाग झाला पण मुळात हा संसर्ग वाढू द्यायचा नसेल तर मास्क अनिवार्य आहेच असे सांगून मुख्यमंत्री म्हणाले की, आता लग्नसराईचे दिवस आहेत. मित्र- आप्तेष्ट परदेशातून देखील येतील त्यामुळे आपल्याला खूप काळजी घ्यावी लागणार आहे. 

परदेशातून आलेल्या व्यक्तींवर लक्ष ठेवणे गरजेचे 

परदेशातून लोक मोठ्या प्रमाणावर मुंबईत व इतर ठिकाणी येणे सुरू झाले आहे . त्यापैकी अनेक जण देशांत इतरत्र उतरून देशांतर्गत विमान सेवेने , रस्ते व रेल्वेमार्गे येतात. त्यांच्यात कुणी विषाणूचा वाहक असेल तर इतरांना मोठा धोका होऊ शकतो त्यामुळे अशा प्रवाशांची तपासणी करणे, त्यांच्याकडे लक्ष ठेवणे अत्यावश्यक आहे , त्यादृष्टीने लगेच युद्ध पातळीवर कामाला लागा असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले. 

चाचण्या वाढवा, आवश्यक किटस पुरवा

यावेळी मुख्यमंत्र्यांनी मधल्या काळात कमी झालेल्या चाचण्यांवर चिंता व्यक्त केली व चाचण्या वाढविण्याचे निर्देश दिले. विषाणूच्या नव्या प्रकाराला ओळखणारे किटस राज्यातील प्रयोगशाळांना मिळण्यासाठी तातडीने कार्यवाही करण्याचे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी दिले. 

Web Title: 'Kuch nahi hota yaar' CM Uddhav Thackeray cautious words over Omicron Corona's New Variant

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.