कुंकू अखंड महाराष्ट्राचं व मंगळसूत्र दुस-याचे, सामनातून मुख्यमंत्र्यांवर ताशेरे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 6, 2017 07:19 AM2017-02-06T07:19:46+5:302017-02-06T09:14:06+5:30

स्वतंत्र विदर्भाच्या मुद्यावर उद्धव ठाकरे यांनी सामनातून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर ताशेरे ओढले आहेत.

Kukku unbroken Maharashtra and Mangalasutra second, against the Chief Minister, Tashera | कुंकू अखंड महाराष्ट्राचं व मंगळसूत्र दुस-याचे, सामनातून मुख्यमंत्र्यांवर ताशेरे

कुंकू अखंड महाराष्ट्राचं व मंगळसूत्र दुस-याचे, सामनातून मुख्यमंत्र्यांवर ताशेरे

Next

ऑनलाइन लोकमत

मुंबई, दि. 6 - स्वतंत्र विदर्भाच्या मुद्यावर उद्धव ठाकरे यांनी सामनातून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर ताशेरे ओढले आहेत.  महाराष्ट्राचा नकाशा विद्रूप करण्याची कारस्थाने सुरू आहेत, असे सांगत उद्धव यांनी मुख्यमंत्र्यांवर हल्लाबोल चढवला आहे.  
 
मुख्यमंत्रीपद लाभले याचा अर्थ अखंड महाराष्ट्राचा नकाशा तोडण्याचा परवाना मिळाला असा होत नाही, असं ठणकावून सांगत 
महाराष्ट्राशी भावनिक जवळीक उरली आहे काय?, असा थेट सवालही मुख्यमंत्र्यांना विचारला आहे.  
 
तसंच गुजरात, कर्नाटक, केरळ, तामीळनाडू, प. बंगाल वगैरे राज्यांत कापाकापीचे ‘प्रयोग’ करावेत, महाराष्ट्राच्या वाटेला जाऊ नये, अशा इशारादेखील उद्धव यांनी दिला आहे. 
(साहित्याच्या व्यासपीठावर शिवसेना-भाजपात राडा)
 
नेमके काय आहे सामना संपादकीयमध्ये?
मुंबईतून थैल्या गोळा करून दिल्लीश्वरांच्या चरणी अर्पण करायच्या. त्याच थैलींची हत्यारे करून मुंबईच्या गळय़ाभोवती फास आवळायचा असे जे उद्योग काही मंडळींनी वर्षानुवर्षे आरंभले आहेत त्या सगळय़ांची कर्दनकाळ म्हणून शिवसेना मुंबईत उभी आहे व शिवसेना आहे तोपर्यंत अखंड महाराष्ट्राचा नकाशा विद्रूप करता येणार नाही याची खात्री बाळगायला हरकत नाही. मुख्यमंत्र्यांनी त्यांचे काम करीत राहावे. आम्ही मुंबई-महाराष्ट्राची लढाई एका श्रद्धेने लढत आहोत. तुम्हाला राममंदिर बांधता आले नाही, वचन देऊनही देशात समान नागरी कायदा लागू करता आला नाही. ही सर्व वचने सहज विसरून गेलात. तसे महाराष्ट्राचा नकाशा तोडण्याचे स्वप्नही विसरून जा. हेच सहजसोपे आहे.
(नगरसेविकेच्या डोक्यात पतीने घातला प्रचाराचा नारळ!)
 
डोंबिवलीत सध्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाची आतषबाजी सुरू आहे. रसिक श्रोत्यांची संख्या रोडावली असली तरी त्या व्यासपीठास स्वतःचे असे एक महत्त्व आहे. या संमेलनात मावळते अध्यक्ष श्रीपाल सबनीस हे पुन्हा चमकले आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे व्यासपीठावर असताना सबनीस यांनी त्यांना तडकावून सांगितले की, महाराष्ट्राचा नकाशा तोडण्याचे पाप करू नका. सबनीस यांच्या धाडसाबद्दल आम्ही त्यांचे जाहीर अभिनंदन आधीच केले आहे. मराठी राज्य म्हणजे महाराष्ट्र तुटण्याची भीती आमच्या साहित्यिक मंडळींच्या  मनातही आहे व या भीतीला ते वाट मोकळी करून देत आहेत. महाराष्ट्रात नवी राजवट दोनेक वर्षांपासून सुरू झाल्यापासून महाराष्ट्राचा नकाशा विद्रूप करण्याची कारस्थाने नव्याने सुरू झाली आहेत. अशा कारस्थानी मंडळींना जेव्हा राज्यकर्त्या पक्षाचे पाठबळ लाभते तेव्हा महाराष्ट्रविरोधकांचा उच्छाद वाढतो. तसेच आता चालले आहे. मुख्यमंत्री फडणवीस हे अखंड महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत. साहित्य संमेलनात त्यांनी ‘बेळगाव, कारवार, निपाणीसह संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे’ अशी भूमिका भले मांडली असेल, पण बेळगाव-कारवार येत असताना विदर्भाच्या बाजूने तुकडा पडणार नाही असे ते बोलायला तयार नाहीत. आताही आधी मुख्यमंत्री असे म्हणाले होते की, ‘आम्हाला मुंबई-महाराष्ट्रात युती हवी आहे.’ प्रत्यक्षात मात्र बेजबाबदारपणे जागांची मागणी झाली. म्हणजे आधी बोललेले विसरायचे. युतीत खोडा टाकायचा आणि युती मोडायची.
(अखंड महाराष्ट्राची शपथ घेतील का?)
 
अखंड महाराष्ट्राबद्दलही त्यांचे असेच धोरण असेल तर जनतेने सावध राहायला हवे. मुख्यमंत्री व त्यांचे भाजपचे सहकारी सत्तेशी जवळीक साधून आहेत. महाराष्ट्राशी त्यांची भावनिक जवळीक उरली आहे काय? हा प्रश्नच आहे. भारतीय जनता पक्षवाल्यांची लहान राज्यांसंदर्भात वेगळी भूमिका असू शकते. हे प्रयोग त्यांनी इतर राज्यांत करावेत. गुजरात, कर्नाटक, केरळ, तामीळनाडू, प. बंगाल वगैरे राज्यांत त्यांनी हे कापाकापीचे ‘प्रयोग’ करावेत, महाराष्ट्राच्या वाटेला जाऊ नये. एका दुर्दैवी परिस्थितीने तुम्हाला पाच-पन्नास जास्त जागा मिळाल्या, मुख्यमंत्रीपद लाभले याचा अर्थ अखंड महाराष्ट्राचा नकाशा तोडण्याचा परवाना मिळाला असा होत नाही. महाराष्ट्र तोडण्याचा प्रयत्न झालाच तर सर्वात मोठा विरोध आमच्या वैदर्भीबांधवांकडूनच होईल. कपाळावर कुंकू अखंड महाराष्ट्राचे लावायचे व खोटे मंगळसूत्र दुसऱयाचे बांधायचे हे धंदे थांबवा. मराठी साहित्य संमेलनाच्या व्यासपीठावरून या भूमिकेचा पुकारा झाला आहे व त्या तुतारीत इतर साहित्यिकांनी आता सूर मिसळायला हवेत. विदर्भातील ग. त्र्यं. माडखोलकर, सुरेश भट, ‘ग्रेस’ म्हणजे माणिक गोडघाटे, विद्याधर गोखले यांच्यासारखी महान साहित्यिक मंडळी ही अखंड महाराष्ट्रवादीच होती. मुंबई महाराष्ट्राला मिळायलाच हवी या लढय़ाच्या बाजूने ही सर्व मंडळी होती. मुख्यमंत्री महोदयांना आता मुंबईवर ताबा हवा आहे. मुंबई ही अखंड महाराष्ट्राची राजधानी आहे. मुंबईचा लढा हा चिंतामणराव देशमुखांसारख्यांच्या त्यागातून आणि १०५ हुतात्म्यांच्या बलिदानातून निर्माण झाला व जिंकला. मुंबई म्हणजे शिवसेनेसाठी मांगल्य आणि प्रेरणा आहे. मुंबईतून थैल्या गोळा करून दिल्लीश्वरांच्या चरणी अर्पण करायच्या. त्याच थैलींची हत्यारे करून मुंबईच्या गळय़ाभोवती फास आवळायचा असे जे उद्योग काही मंडळींनी वर्षानुवर्षे आरंभले आहेत त्या सगळय़ांची कर्दनकाळ म्हणून शिवसेना मुंबईत उभी आहे व शिवसेना आहे तोपर्यंत अखंड महाराष्ट्राचा नकाशा विद्रूप करता येणार नाही याची खात्री बाळगायला हरकत नाही. मुख्यमंत्र्यांनी त्यांचे काम करीत राहावे. आम्ही मुंबई-महाराष्ट्राची लढाई एका श्रद्धेने लढत आहोत. तुम्हाला राममंदिर बांधता आले नाही, वचन देऊनही देशात समान नागरी कायदा लागू करता आला नाही. ही सर्व वचने सहज विसरून गेलात. तसे महाराष्ट्राचा नकाशा तोडण्याचे स्वप्नही विसरून जा हेच सहजसोपे आहे.

Web Title: Kukku unbroken Maharashtra and Mangalasutra second, against the Chief Minister, Tashera

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.