कुमार पिल्लेच्या आवाजाचे नमुने घेणार
By Admin | Published: June 29, 2016 02:05 AM2016-06-29T02:05:02+5:302016-06-29T02:05:02+5:30
विक्रोळीच्या विकासकावर खंडणीसाठी केलेल्या हल्ल्याप्रकरणी मोक्का न्यायालयाने गँगस्टर कुमार पिल्लेला पोलीस कोठडी सुनावली आहे.
मुंबई : विक्रोळीच्या विकासकावर खंडणीसाठी केलेल्या हल्ल्याप्रकरणी मोक्का न्यायालयाने गँगस्टर कुमार पिल्लेला पोलीस कोठडी सुनावली आहे. त्याच्या आवाजाचे नमुने घेण्यात येणार आहेत. यापूर्वी २००९मध्ये गुन्हे शाखेने त्याचा आवाज रेकॉर्ड केला होता. दोन्ही आवाजाच्या नमुन्यांत साम्य आहे का, याची पडताळणी करून तपासाला सुरुवात होणार आहे. गुन्हे शाखेच्या युनिट ७चे वरिष्ठ निरीक्षक संजय सुर्वे यांचे पथक तपास करत आहे.
२००९ साली रमेश शहा या विकासकाला खंडणीसाठी धमकावून हत्येचा प्रयत्न केला होता. त्यापाठोपाठ लोढा या विकासकाच्या कार्यालयात घुसून त्याने गोळीबार केला होता. २०१३मध्ये मनसे आमदार मंगेश सांगळे यांना खंडणीसाठी धमकावले होते. या तीन गुन्ह्यांचा सखोल तपास गुन्हे शाखेने सुरू केला आहे.
शहा यांच्याकडून पिल्लेने ५० लाखांची खंडणी मागितली होती. त्यांच्या कार्यालयात घुसून गोळीबार केला होता. या प्रकरणी सहा जणांना अटक करण्यात आली होती. यातील तिघांना मोक्का न्यायालयाने दोषी ठरविले होते; तर कुमार पिल्लेला फरार घोषित केले होते. कुमार पिल्ले हा ‘केपी’ नावाने पूर्व उपनगरात टोळी चालवित होता. १९९७ साली पिल्लेने मुंबई सोडली आणि तो हाँगकाँगला गेला. २०१२ साली मुंबई पोलीस आणि इंटरपोलने पिल्लेविरोधात रेडकॉर्नर नोटीस जारी केली. त्याने हाँगकाँगचे नागरिकत्व घेतले. अखेर त्याला सिंगापूर पोलिसांनी अटक केली. सध्या त्याची चौकशी सुरू असल्याचे सहआयुक्त गुन्हे संजय सक्सेना यांनी सांगितले. (प्रतिनिधी)
आईने केला
भेटण्याचा प्रयत्न
पिल्लेला घेऊन तपास पथक मुंबई विमानतळावर दाखल झाले तेव्हा त्याची आई त्याला भेटण्यासाठी तेथे आली होती. मात्र पोलीस पिल्लेला घेऊन थेट निघाल्याने त्यांची भेट झाली नाही.