लैंगिक शोषणातून कुमारीमाता
By admin | Published: March 12, 2016 04:09 AM2016-03-12T04:09:40+5:302016-03-12T04:09:40+5:30
आदिवासी कुटुंबांमधील अठराविश्वे दारिद्र्य, मुलींकडे सातत्याने होणारे दुर्लक्ष आणि मुलींनी घराबाहेर पाऊल ठेवताच त्यांच्यावर डोळा ठेवून असलेले नरपशू...
सुरेश लोखंडे, ठाणे
आदिवासी कुटुंबांमधील अठराविश्वे दारिद्र्य, मुलींकडे सातत्याने होणारे दुर्लक्ष आणि मुलींनी घराबाहेर पाऊल ठेवताच त्यांच्यावर डोळा ठेवून असलेले नरपशू... याच्या करुण कहाण्या येथील पाड्यांवर ‘लोकमत’च्या प्रतिनिधीला ऐकायला मिळाल्या. दोन अल्पवयीन आदिवासी मुलींनी त्यांच्यावर बलात्कार झाल्याची तक्रार नोंदवून घेण्यास पोलिसांना भाग पाडले. अन्यथा, पोलिसांच्या लेखी आदिवासी मुलींच्या अब्रूचे काही मोलच नाही.
आदिवासी विकासमंत्री विष्णू सवरा यांच्या विक्रमगड तालुक्यातीलपोलीस ठाण्यात बनी पारधी व सुनी भोईर (दोघींचेही नाव बदलले आहे) यांनी तक्रार दाखल केल्यानंतरही अजून आरोपींना अटक झालेली नाही.
कुपोषित बालकांना जन्म देणाऱ्या बहुतांश माता अल्पवयीन आहेत. त्यापैकी अनेकींची लहान वयात लग्ने करून दिली आहेत, तर काही मुली कुमारीमाता बनल्या आहेत. याखेरीज, काही अल्पवयीन मुली वासनांध प्रवृत्तीच्या शिकार बनल्या आहेत. या मुलींनी गर्भपात करावे, याकरिता त्यांना धमकावले जाते, तर पोलीस ठाण्यात जाऊन बलात्काराचा गुन्हा दाखल करणे, हे त्यांच्याकरिता फारच शौर्याचे लक्षण आहे. पालकांचे या मुलींकडे संपूर्ण दुर्लक्ष होत असल्याने बलात्कार झाला तरी त्याची घरात दखल घेतली जात नाही. गर्भपाताची सक्ती पालकच करतात किंवा गर्भपात अशक्य असेल तर मूल जन्माला घालतात व मूग गिळून गप्प बसण्यास भाग पाडतात.
इयत्ता ११वीत शिकणारी बनी पारधी (नाव बदलले आहे) मावशीच्या घरी राहून कॉलेजला जात असे. मावशी सुनीता बोत्रा हिला वाडा तालुक्यातील सर्वदास भोईर याने पैशांचा पाऊस पाडतो, बनीला घेऊन ये, असे सांगितले. भोईरच्या मोटारसायकलवरून सुनीताने बनीला शेतावर नेले. तोपर्यंत बनीला कसलीही कल्पना नव्हती. शेतातील एक घरात तिच्या अंगाला हळद, कुंकू, गुलाल याने माखून टाकल्यानंतर सर्वदासने तिच्या मावशीसमोर बलात्कार केला. मावशी आणि भोईरच्या तावडीतून कशीबशी सुटका करून बनी घरी आईकडे आल्यानंतर तिला सर्व प्रकार सांगितला. मात्र, बनी आणि तिच्या आईला ठार मारण्याच्या धमक्या दिल्या गेल्या. बनीच्या वडिलांचा यापूर्वीच मृत्यू झालेला असल्याने दीर्घकाळ बनी बलात्काराची सल मनात ठेवून होती.
बालापूरच्या पाटीलपाडा येथील सुनी भोईर (वय १४) (नाव बदलले आहे) हिच्या आईच्या मृत्यूनंतर ती भावंडांना घेऊन रात्रीची शेजारच्या सुभाष व सुधा गायकवाड या कुटुंबाच्या घरी झोपायला जात असे. वडील कामाच्या निमित्ताने बाहेरगावी राहत असत. याचाच गैरफायदा घेत सुभाषने सुनीवर बलात्कार केला. सुनीने ही गोष्ट सुभाषची पत्नी सुधाला सांगितली. यानंतर, सुधाने घरी येण्यास सुनीला बंदी घातली. तीन भावंडांसोबत सुनी आपल्या घरी झोपत असतानाही सुभाष रात्रीचा येऊन तिच्यावर जबरदस्ती करीत होता. कुणाला सांगू नको; अन्यथा ठार करीन, अशी धमकी सुभाष सतत देत असे. दरम्यानच्या कालावधीत सुनी गर्भवती असल्याचे लक्षात येताच सुभाष व सुधा यांनी तिला आंबिस्ते गावात नेऊन तिचा गर्भपात केला, असे सुनीने सांगितले. आता ती वडिलांसोबत उपराल या गावी राहते. श्रमजीवीच्या कार्यकर्त्यांना हे कळल्यावर त्यांनी पोलिसांना तक्रार घेण्यास भाग पाडले. मात्र, अजून आरोपींना अटक झालेली नाही. अत्याचार करणाऱ्यांना अटक करण्याच्या मागणीकरिता विक्रमगड पोलीस ठाण्याबाहेर सकाळपासून आंदोलन सुरू होते. मात्र पोलिसांनी सायंकाळपर्यंत आंदोलनाची दखलही घेतली नव्हती.