कोकणात धूमशान; मराठवाडा दुष्काळमुक्त!

By admin | Published: September 25, 2016 06:08 AM2016-09-25T06:08:47+5:302016-09-25T06:08:47+5:30

कोकणात परतीच्या पावसाचे धूमशान सुरूच असून, अतिवृष्टीमुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. ठिकठिकाणी पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. तर या पावसाने

Kumarkan; Marathwada is free of drought! | कोकणात धूमशान; मराठवाडा दुष्काळमुक्त!

कोकणात धूमशान; मराठवाडा दुष्काळमुक्त!

Next

मुंबई : कोकणात परतीच्या पावसाचे धूमशान सुरूच असून, अतिवृष्टीमुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. ठिकठिकाणी पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. तर या पावसाने कृपादृष्टी केल्याने मराठवाड्यातील दुष्काळग्रस्तांना दिलासा मिळाला आहे. विभागातील बहुतांश बंधारे व धरणांमध्ये दमदार साठा झाल्याने वर्षभराची तहान भागणार आहे. चार दिवसांच्या पावसाने नद्या दुथडी भरून वाहत आहेत. लातूर जिल्हा टंचाईमुक्त झाला असून, बीड, उस्मानाबाद व परभणीत पावसाने सरासरी ओलांडली आहे.
रायगड जिल्ह्यात ११ गावांत पुराचे पाणी शिरले. आंबा, कुंडलिका नद्यांनी पूररेषा ओलांडली. सिंधुदुर्गात सलग दुसऱ्या दिवशी पावसाची संततधार सुरूच होती. फोंडाघाटमध्ये दरड कोसळून वाहतूक विस्कळीत झाली होती.
मुंबई-गोवा महामार्गावर कोलाड हद्दीतील सुकेळी खिंडीतील तसेच चिपळूण परशुराम घाटात दरडी कोसळल्याने शुक्रवारपासून मुंबई - गोवा महामार्गावरील वाहतूक ठप्प होती. शनिवारी दुपारी तब्बल १० तासांनंतर ही वाहतूक सुरळीत झाली. मात्र सायंकाळी साडेपाचच्या सुमारास पुन्हा सुकेळी खिंडीत दरड कोसळल्याने वाहतूक ठप्प झाली. दरड हटविण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे.
मुसळधार पावसामुळे महाड तालुक्यात अनेक ठिकाणी दरडीचा धोका असल्याने त्या परिसरातील नागरिकांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित करण्याचे आदेश महाड महसूल विभागाने दिले होते. अलिबागजवळील ताडवागळे व वाघोडे येथे बंधाऱ्याचे कठडे वाहून गेल्याने शेतात पाणी गेल्यामुळे शेकडो हेक्टर भातशेतीचे मोठे नुकसान झाले आहे. तर चरी गावातील डिजिटल जि. प. शाळेत पूराचे पाणी घुसल्याने मोठी आर्थिक नुकसान झाले आहे. संपूर्ण जिल्ह्यात पावसाचा कहर सुरूच असून घरे, शेतीच्या नुकसानीसाठी पंचमाना करण्यात येत आहे. त्यानंतर नेमके किती नुकसान झाले हे स्पष्ट होऊ शकेल.
उस्मानाबाद जिल्ह्यातील सात मंडळात अतिवृष्टी झाल्याने पिकांचे मोठे नुकसान झाले. पाथरी- माजलगाव रस्त्यावरील पुलावर पाणी आल्याने परभणी आणि बीड जिल्ह्यांचा संपर्क ठप्प झाला. गेल्या चार दिवसा२ंपासून लातूर जिल्ह्यात पाऊस सुरू आहे. हिंगोली जिल्ह्यात नदी-नाले दुथडी भरुन वाहत आहेत. जालना जिल्ह्यात आतापर्यंत सरासरीच्या ९०. ६९ टक्के पाऊस झाला. जिल्ह्यातील
दूधना, पूर्णा, कुंडलिका, सीना नद्यांना पूर आला आहे. निम्नदुधनाचे तीन दरवाजे उघडण्यात आले. कोल्हापूर जिल्ह्यात नद्यांच्या पातळीत कमालीची वाढ झाली आहे. धरणक्षेत्रात सुरू असलेल्या दमदार पावसाने राधानगरी धरणाचे
सातही दरवाजे शनिवारी खुले
झाले. ‘काळम्मावाडी’तूनही विसर्ग वाढविण्यात आला. पंचगंगेची पातळी सतत वाढत आहे. (लोकमत न्यूज नेटवर्क)

विष्णुपुरीचे दरवाजे उघडले
शनिवारी नांदेडमधील विष्णुपुरी प्रकल्प आठ, लिंबोटी सात, तर परभणी जिल्ह्यातील निम्न दूधना प्रकल्पाचे १८ दरवाजे उघडण्यात आले. त्यामुळे गोदावरी नदीला पूर आला आहे. लातूर ६३.६६, उस्मानाबाद ४२.९२ तर नांदेड जिल्ह्यात दिवसभरात ५०.८ मि.मी. पावसाची नोंद झाली.

नगरमध्ये चार बळी : नगर जिल्ह्यात विविध दुर्घटनांमध्ये तिघांचा मृत्यू झाला, तर खर्डा येथे पुरात वाहून गेल्याने शेतकऱ्याचा मृत्यू झाला. अकोलेतील फोफसंडी येथे वीज पडून कमलाकर काशीनाथ वळे (२०) याचा मृत्यू झाला. धनेगाव (ता. जामखेड) येथे चंद्रहास आत्माराम चव्हाण (५५) हे पुराच्या पाण्यात वाहून गेले. सोनईत कौतुकी नदीत पोहण्यासाठी गेलेला वैभव संजय पवार हा मुलगा गाळात रुतून मरण पावला, तर सुनील देशमुख (३७) यांचा शेततळ््यात बुडून मृत्यू झाला.

जायकवाडीत ६८% जलसाठा
पाणलोट क्षेत्रात झालेल्या पावसामुळे जायकवाडी धरणातील जलसाठ्यात २४ तासांत एक टीएमसीने वाढ झाली. धरणातील जलसाठा शनिवारी ६८ टक्क्यांवर पोहोचला.

मुसळधार पावसाचा इशारा
२५ सप्टेंबरपासून चार दिवस मुसळधार पाऊस होईल, असा इशारा हवामान खात्याने दिला आहे.

Web Title: Kumarkan; Marathwada is free of drought!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.