वाद वाढल्यानंतर कुणाल कामरा महाराष्ट्राबाहेर पसार? रात्रीपासून फोनही बंद
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 24, 2025 10:54 IST2025-03-24T10:53:33+5:302025-03-24T10:54:45+5:30
Kunal Kamra: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना उद्देशून सादर केलेल्या व्यंगात्मक गाण्यामुळे वादाला तोंड फुटल्यानंतर कुणाल कामरा हा महाराष्ट्राबाहेर पसार झाल्याचा दावा करण्यात येत आहे. तसेच त्याचा फोनही बंद असल्याची माहिती मिळत आहे.

वाद वाढल्यानंतर कुणाल कामरा महाराष्ट्राबाहेर पसार? रात्रीपासून फोनही बंद
स्टँडअप कॉमेडियन कुणाल कामरा याने राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना उद्देशून सादर केलेल्या व्यंगात्मक गाण्यामुळे मोठा वाद निर्माण झाला असून, या कुणाल कामरा विरोधात शिवसेना शिंदे गटाचे नेते आणि शिवसैनिक आक्रमक झाले आहेत. कुणाल कामराने केलेल्या या टिप्पणीनंतर त्याच्या शोच्या सेटवर धडक देत शिवसैनिकांनी सेटची मोडतोड केली. तसेच कुणाल कामराची धुलाई करण्याचे तसेच त्याच्या तोंडाला काळं फासण्याचे इशारेही शिंदे गटाच्या नेत्यांकडून देण्यात येत आहेत. या दरम्यान, कुणाल कामराबाबत महत्त्वाची माहिती समोर आली आहे. या वादाला तोंड फुटल्यानंतर कुणाल कामरा हा महाराष्ट्राबाहेर पसार झाल्याचा दावा करण्यात येत आहे. तसेच त्याचा फोनही बंद असल्याची माहिती मिळत आहे.
कुणाल कामराने केलेलं विधान आणि त्याच्यावरील पुढील कारवाईबाबत अधिक माहिती देताना गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी सांगितले की, या प्रकरण्यात जी कुणी व्यक्ती आहे त्याच्याविरोधात कठोर कारवाई केली जाईल. ही घटना कधी घडली, याची माहिती घेतली जात आहे. कुणाल कामराचं लोकेशन ट्रेस करण्याचं काम सध्या सुरू आहे. सध्या तो कुठे आहे, हे आम्हाला माहिती नाही. मात्र त्याचं लोकेशन तपासण्याचं काम केलं जात आहे.
यावेळी शिवसैनिकांनी कुणाल कामराच्या सेटवर केलेल्या हल्ल्याबाबत योगेश कदम यांनी पुढे सांगितले की, कायदा हा सर्वांसाठी समान आहे, परंतु शिवसैनिकांच्या भावना आपण समजून घेतल्या पाहिजेत. जर अशा प्रकारची भडकावू भाषणं, अपमानास्पद व्हिडीओ व्हायरल केले जात असतील, तर त्याविरोधात शिवसैनिकांच्या प्रतिक्रिया येणं साहजिकच आहे, असंही योगेश कदम यांनी म्हटलं आहे.