कुंडलिका नदी पुलाची दुरवस्था
By Admin | Published: June 29, 2016 01:40 AM2016-06-29T01:40:52+5:302016-06-29T01:40:52+5:30
कोळवाडी, वडवली, वळवंती, उंबरवाडी या गावांना जाण्यासाठी कुंडलिका नदीवर(खडकीजवळ) बांधण्यात आलेला पुलाची दुरवस्था झाली आहे.
करंजगाव : जांभवली, थोरण, शिरदे, सोमवडी, भाजगाव, कोळवाडी, वडवली, वळवंती, उंबरवाडी या गावांना जाण्यासाठी कुंडलिका नदीवर(खडकीजवळ) बांधण्यात आलेला पुलाची दुरवस्था झाली आहे.
हा पूल अरुंद आहे. या पुलावरून एका वेळी एकच मोटार जाऊ शकते. जर एका बाजूने वाहन आले, तर दुसऱ्या बाजूने येणाऱ्या वाहनाला येण्यासाठी जागाच नसते. तसेच या पुलाच्या कडेचे सुरक्षेसाठी असणारे लोखंडी कठडे तुटलेले आहेत.
अपघात झाल्यामुळे लोखंडी कठडे तुटले आहेत. पुलावर मोठमोठे खड्डे पडले आहेत. पुलावरची खडी व डांबर वाहून गेला आहे. त्यामुळे वाहनांचा अपघात होण्याचा धोका आहे.
पावसाचे पाणी साचून, चिखल होऊन रस्त्यावर अपघात होतो. या प्रकारचा त्रास नागरिकांना सोसावा लागतो. रस्त्याच्या बाजूने झाडे-झुडपे वाढल्यामुळे प्रवाशांना त्रास होत आहे. रात्री-अपरात्री प्रवाशांना जीव मुठीत धरून वाहन चालवावे लागते.
प्रशासनाने पुलाच्या कठड्याची दुरुस्ती करावी, अशी मागणी नागरिक करीत आहेत. (वार्ताहर)