चोरी करुन हाती लागले काय तर कॉन्डम, तूप आणि साबण
By admin | Published: October 19, 2016 11:19 AM2016-10-19T11:19:03+5:302016-10-19T11:35:58+5:30
मोठा दरोडा मारण्याच्या उद्देशाने एका इमारतीत घुसलेल्या दोन चोरांना फक्त कॉन्डम, तूप आणि साबणावर समाधान मानवे लागले आहे.
Next
ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 19 - मोठा दरोडा मारण्याच्या उद्देशाने एका इमारतीत घुसलेल्या दोन चोरांना फक्त कॉन्डम, तूप आणि साबणावर समाधान मानावे लागले आहे. मोठी रोकड हाती लागावी, यासाठी दोघांनी तब्बल तीन वेळा चोरीचा प्रयत्न केला, पण हाती लागले काय तर कॉन्डम, तूप, साबण आणि केवळ 8 हजार रुपये. नालासोपारा रेल्वे स्टेशनजवळील पार्श्वनाथ इमारतीमधील ही घटना आहे. त्यांच्या या अपयशी चोरीच्या लीला सीसीटीव्हीमध्ये कैद होत आहेत, याचीदेखील त्यांना कल्पनादेखील नव्हती.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुरुवातीला या चोरांनी तळमजल्यावरील एका मेडिकल स्टोअरचे शटर तोडून त्यात घुसखोरी केली. येथे त्यांच्या हाती केवळ 5 हजार रुपयेच लागले. यानंतर त्यांनी येथील कॉन्डमची पाकिटे, कॉम्प्यूटरचा सीपीयू आणि मोबाईल फोनवर डल्ला मारला. ही चोरी करताना यातील एकजण जखमी झाल्याने त्याच्या रक्ताचे थेंब स्टोरमध्ये पडले होते. यावरुन चोरी झाल्याची बाब उघड झाली. चोरी झालेल्या सीपीयूमध्ये महत्त्वपूर्ण डाटा असल्याने पोलिसांनी चिंता व्यक्त केली आहे.
पहिल्या प्रयत्नात महागड्या वस्तू हाती न लागल्याने दोघांनी आपला मोर्चा दुस-या मेडिकल स्टोरमध्ये वळवला. येथेही त्यांच्या हाती मोठं घबाड लागलेच नाही. येथे फक्त त्यांना 3 हजार रुपये आणि पंतजलीचे तूप, चॉकलेट आणि साबणावरच समाधान मानावे लागले. तिसरी चोरी करण्यासाठी हे दोघे एका कोचिंग सेंटरमध्ये घुसले. तिथेही पदरी निराशाच पडली, कारण येथे त्यांना केवळ एक स्वस्तातील मोबाईलच सापडला.
चोरीसाठी एवढी मेहनत करुनही दोघांच्या हाती फक्त कॉन्डम, तूप, साबण आणि 8 हजार रुपयेच लागले आहेत. चोरांचे दुर्दैव आणि स्टोअर मालकांचे सुदैव म्हणावे लागेल. मात्र, सीसीटीव्हीमध्ये जरी दोनच चोर दिसत असले, तरी बाहेर आणखी काही चोर यांची वाट पाहत होते, असा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहे.