कुरुलकरचे व्हॉट्सॲप चॅट असे झाले ‘रिकव्हर’; पाकला गोपनीय माहिती दिल्याचा आरोप
By ऑनलाइन लोकमत | Published: May 17, 2023 06:18 AM2023-05-17T06:18:14+5:302023-05-17T06:19:04+5:30
पॉलिग्राफ चाचणी करण्याबाबत कुरूलकर व त्याच्या पत्नीला माहिती देण्यात आली आहे. त्यांचे संमतीपत्र मिळाल्यानंतर ही चाचणी केली जाऊ शकते.
पुणे : ‘डीआरडीओ’चा संचालक डॉ. प्रदीप कुरूलकर याने मोबाइलवरील व्हॉट्सॲप ॲप्लिकेशन डिलिट केले होते. त्यामुळे न्याय वैज्ञानिक प्रयोगशाळेला मोबाइल डिकोड करता येत नव्हता. दहशतवादी विरोधी पथकाने (एटीएस) मोबाइल ताब्यात घेऊन फिजिकली कुरूलकर याचे सीमकार्ड ‘६ टी’मध्ये टाकून रीतसर पासवर्डद्वारे मोबाइल सुरू केला. नंतर व्हॉट्सॲप डाऊनलोड करून त्याच्या क्रमांकाचे ॲक्टिव्हेट केले व बॅकअप घेतला असता पाकिस्तानी महिला हेराबरोबर कुरूलकरचे झालेले चॅट रिकव्हर केल्याची माहिती एटीएसच्या अहवालातून समोर आली. पॉलिग्राफ चाचणी करण्याबाबत कुरूलकर व त्याच्या पत्नीला माहिती देण्यात आली आहे. त्यांचे संमतीपत्र मिळाल्यानंतर ही चाचणी केली जाऊ शकते.
२९ मेपर्यंत दिली न्यायालयीन कोठडी
कुरूलकरची येरवडा कारागृहात रवानगी केली आहे. त्याला २९ मेपर्यंत न्यायालयीन कोठडीचे आदेश विशेष न्यायाधीश पी. पी. जाधव यांनी दिले. मधुमेह असल्याने त्याला औषध उपलब्ध करून दिली जाणार आहेत. मात्र, कारागृहात घरचे जेवण मिळावे, ही विनंती मान्य केली नाही.