कुसेगाव सीसीटीव्ही बसविणारे तालुक्यातील पहिले गाव
By admin | Published: July 13, 2017 01:17 AM2017-07-13T01:17:35+5:302017-07-13T01:17:35+5:30
कुसेगाव येथील ग्रामपंचायत प्रशासनाच्या वतीने गावात विविध उपक्रम राबविले जात
लोकमत न्यूज नेटवर्क
वासुंदे : कुसेगाव येथील ग्रामपंचायत प्रशासनाच्या वतीने गावात विविध उपक्रम राबविले जात असून नुकत्याच एका वेगळ््या उपक्रमाची म्हणजेच सीसीटीव्ही कॅमेरा यासारख्या माहिती व तंत्रज्ञान क्षेत्रातील अत्याधुनिक सुविधेची सुरुवात गावाने सुरु केल्याने
कुसेगाव हे दौंड तालुक्यातील सीसीटीव्ही कॅमेरे बसविणारे पहिले गाव ठरले आहे.
गावामध्ये बसविण्यात आलेल्या या अत्याधुनिक यंत्रणेचे उदघाटन यवत पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक धन्यकुमार गोडसे, गटविकास अधिकारी विनायक गुळवे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी सरपंच मनोज फडतरे, जिल्हा परिषद सदस्य गणेश कदम, पंचायत समिती सदस्य नितीन दोरगे, तालुका कृषी अधिकारी अनिल बोरावके, सत्वशील शितोळे, प्रशांत शितोळे, रमेश भोसले, काका खळदकर, डॉ.रामदास आव्हाड, डॉ.कांबळे, नवनीत जाधव, विजय शितोळे, श्रीकांत शितोळे, गणेश मोरे, मनिष शितोळे, अनिल शितोळे, प्राचार्य विनायक सुंबे, ग्रामसेवक दिपक बोरावके तसेच ग्रामस्थ उपस्थित होते.
सरपंच मनोज फडतरे यांनी सांगितले की, कुसेगावसारख्या जिरायत पट्ट्यातील गावाने शासनाच्या विविध योजनांमध्ये सहभाग घेऊन गावच्या लोकसंख्येपेक्षा जास्त झाडे गावात लावली आहेत. तसेच निर्मल ग्राम योजना, हागणदारीमुक्त गाव योजना, तंटामुक्ती अभियान, जलयुक्त शिवार अभियान अशा विविध योजनांमधून उल्लेखनिय कामगिरी बजावली आहे. आणि सीसीटीव्ही कॅमेरे बसवून माहिती व तंत्रज्ञान क्षेत्रातील आणखी एक पाऊल पुढे टाकले आहे. निश्चितच हे सर्व करण्यासाठी गावातील सर्व संस्थांचे आजीमाजी पदाधिकारी, ग्रामस्थ, शिक्षक व विद्यार्थी यांचा मोलाचा वाटा आहे. भविष्यात दौंड तालुक्यातील कुसेगावची ओळख ही स्मार्ट व्हिलेज म्हणून होईल असा दृढ विश्वास सरपंच मनोज फडतरे यांनी व्यक्त केला.
या वेळी पोलीस निरीक्षक धन्यकुमार गोडसे यांनी सांगितले की, कुसेगाव सारख्या ग्रामीण भागातील एका छोट्या गावाने सीसीटीव्ही सारखी यंत्रणा सुरु केल्याने गावातील कायदा व सुव्यवस्था राखण्यात पोलीसांना निश्चितच मदत होईल. तसेच पोलीसांचे कामही काही प्रमाणात कमी होईल. त्यामुळे आगामी काळात कुसेगावचा आदर्श इतर गावांनी घेणे गरजेचे आहे.