कुशाभाऊ बांगर शाळेची घंटा वाजली!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 23, 2015 01:53 AM2015-08-23T01:53:32+5:302015-08-23T01:53:32+5:30
चांदिवली येथील संघर्षनगरमधील कुशाभाऊ बांगर शाळेवर होत असलेल्या तोडक कारवाईविरोधात न्यायालयाची पायरी चढलेल्या चिमुकल्यांच्या संघर्षाला यश आले असून, न्यायालयाच्या आदेशानुसार
मुंबई : चांदिवली येथील संघर्षनगरमधील कुशाभाऊ बांगर शाळेवर होत असलेल्या तोडक कारवाईविरोधात न्यायालयाची पायरी चढलेल्या चिमुकल्यांच्या संघर्षाला यश आले असून, न्यायालयाच्या आदेशानुसार शाळेचे वर्ग पर्यायी जागेत भरविणे सुरु झाले आहे. शुक्रवारपासून पर्यायी जागेत शाळेचे वर्ग भरविण्यात आल्याने विद्यार्थ्यांनाही दिलासा मिळाला असून, शाळेने समाधान व्यक्त केले आहे.
बांगर या अनुदानित शाळेवर विकासकाच्या संगनमतामुळे कारवाईचा बडगा उगारण्यात येत असताना विद्यार्थ्यांनी आक्रमक भूमिका घेतली. पाचवी ते दहावीपर्यंतच्या सुमारे ३५० विद्यार्थ्यांनी प्रशासनाविरोधातच आवाज उचलला आणि लढा दिला. तब्बल दोन वेळा शाळेवर कारवाई करण्यासाठी दाखल झालेल्या पालिकेला विद्यार्थ्यांसमोर माघार घ्यावी लागली. अखेर उच्च न्यायालयात यावर झालेल्या सुनावणीदरम्यान ३० एप्रिल २०१६ पर्यंत विद्यार्थ्यांचे शैक्षणिक वर्ष पूर्ण व्हावे यासाठी त्याच परिसरात पर्यायी सात वर्ग उपलब्ध करून देण्याचे आदेश न्यायालयाने विकासकाला दिले. त्यानुसार विद्यार्थ्यांना पर्यायी जागी उपलब्ध करून देण्यात आली.
पुढे काय? : विद्यार्थ्यांचे शैक्षणिक वर्ष वाया जाणार नाही, याचे समाधान आहे. मात्र मराठी शाळांचा मुद्दा ऐरणीवर आहे. शाळा शंभर टक्के अनुदानित असताना पालिकेकडून शाळेसाठी कायमस्वरुपी पर्यायी व्यवस्था करण्याबाबत पुढाकार घेतला जात नाही. त्यामुळे कालांतराने जागेअभावी शाळा बंद पडणार का? हा सवाल असून, याबाबत पालिका प्रशासनाशी पत्रव्यवहार सुरु आहे, अशी माहिती स्थानिक नगरसेवक ईश्वर तायडे यांनी दिली.