शासन भरवणार ‘कुसुमाग्रज महोत्सव’

By admin | Published: July 19, 2016 05:40 PM2016-07-19T17:40:01+5:302016-07-19T17:40:01+5:30

आपल्या तेजस्वी लेखणीद्वारे अवघ्या साहित्यविश्वावर अधिराज्य गाजवणाऱ्या कविश्रेष्ठ कुसुमाग्रजांच्या नावाने आता महाराष्ट्र शासन ‘कुसुमाग्रज महोत्सव’ भरवण्याच्या विचारात

'Kusumagraj Mahotsav' to be filled by government | शासन भरवणार ‘कुसुमाग्रज महोत्सव’

शासन भरवणार ‘कुसुमाग्रज महोत्सव’

Next

ऑनलाइन लोकमत
नाशिक, दि. 19 - आपल्या तेजस्वी लेखणीद्वारे अवघ्या साहित्यविश्वावर अधिराज्य गाजवणाऱ्या कविश्रेष्ठ कुसुमाग्रजांच्या नावाने आता महाराष्ट्र शासन ‘कुसुमाग्रज महोत्सव’ भरवण्याच्या विचारात आहे. या महोत्सवातून कुसुमाग्रजांचे साहित्य युवा पिढीपर्यंत पोहोचवण्याचा सरकारचा प्रयत्न राहणार आहे. वि. वा. शिरवाडकर तथा कवी कुसुमाग्रज यांच्या साहित्याने मराठीत अढळ स्थान प्राप्त केले आहे. कवी, लेखक, नाटककार असे अनेक पैलू असणाऱ्या तात्यासाहेबांच्या लेखणीतून ‘विशाखा’, ‘प्रवासी पक्षी’सारखे काव्यसंग्रह, ‘नटसम्राट’, ‘कौंतेय’ यांसारखी नाटके, तर ‘वैष्णव’, ‘जान्हवी’ यांसारख्या सकस कादंबऱ्या मराठी साहित्यात अवतरल्या. त्यांनी दिलेल्या पन्नासहून अधिक वर्षांच्या साहित्यिक योगदानासाठी त्यांना साहित्य क्षेत्रातील भारतातील सर्वोच्च अशा ‘ज्ञानपीठ’ पुरस्काराने गौरवण्यात आले. त्यांच्या जन्मदिनी (२७ फेब्रुवारी) राज्यभरात मराठी राजभाषा दिन साजरा केला जातो व यानिमित्ताने मराठी भाषेचा जागर केला जातो. नाशकात कुसुमाग्रजांच्या हयातीत स्थापन झालेली कुसुमाग्रज प्रतिष्ठान ही संस्था कार्यरत असून, या संस्थेद्वारे साहित्य, सांस्कृतिक व सामाजिक क्षेत्रात योगदान दिले जाते. प्रतिष्ठानच्या वतीने ‘जनस्थान’ व ‘गोदावरी गौरव’ हे प्रतिष्ठेचे पुरस्कारही दिले जातात. तथापि, कुसुमाग्रजांचे साहित्य व विचार जनसामान्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी आणखी काय करता येईल, याचा विचार राज्य शासनाच्या वतीने होत असून, कुसुमाग्रजांच्या नावाने लवकरच ‘कुसुमाग्रज महोत्सव’च भरवण्याच्या हालचाली सुरू आहेत. या महोत्सवातून तात्यासाहेबांच्या साहित्याची ओळख युवा पिढीला करून देण्याचा शासनाचा मानस आहे. यासंदर्भात सांस्कृतिक कार्य तथा मराठी भाषामंत्री विनोद तावडे यांनी पुढाकार घेतला आहे. यानिमित्त पुन्हा एकदा कुसुमाग्रजांच्या साहित्याचा जागर होणार आहे. महोत्सवात कुसुमाग्रजांच्या कविता, नाटके व अन्य लेखणावर राज्यातील मान्यवरांकडून प्रकाश टाकला जाणार असून, यावेळी कुसुमाग्रजांची पुस्तकेही उपलब्ध करून दिली जाणार असल्याचे वृत्त आहे.

महोत्सव नाशिकला?
कुसुमाग्रज महोत्सव आयोजित करण्याचा राज्य शासनाचा विचार असला, तरी हा महोत्सव नेमका कोठे व कधी घेतला जाईल, याबाबत अद्याप तरी कोणतीही माहिती उपलब्ध होऊ शकलेली नाही; मात्र कुसुमाग्रजांचे गाव असलेल्या नाशिकमध्येच हा महोत्सव भरवला जाईल, अशी अटकळ बांधली जात आहे.

Web Title: 'Kusumagraj Mahotsav' to be filled by government

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.