मजुरांचे स्थलांतर सुरू
By admin | Published: September 9, 2015 12:55 AM2015-09-09T00:55:19+5:302015-09-09T00:55:19+5:30
दुष्काळजन्य परिस्थितीमुळे रोजगाराच्या शोधात मोठ्या संख्येने स्थलांतर सुरू असून, मागील महिनाभरात मराठवाड्यातून सुमारे चार लाखांपेक्षा अधिक मजूर प्रामुख्याने
औरंगाबाद : दुष्काळजन्य परिस्थितीमुळे रोजगाराच्या शोधात मोठ्या संख्येने स्थलांतर सुरू असून, मागील महिनाभरात मराठवाड्यातून सुमारे चार लाखांपेक्षा अधिक मजूर प्रामुख्याने मुंबई अािण पुण्याकडे रवाना झाले आहेत. येत्या महिनाभरात स्थलांतरितांची संख्या वाढण्याची शक्यता आहे.
बीड जिल्ह्यातून सर्वाधिक मजुरांचे स्थलांतर होत आहे. कारण दोन लाख पन्नास हजार मजुरांनी जॉब कार्ड घेतले असले तरी यापैकी केवळ ८० हजार मजुरांना काम मिळाले आहे. शिवाय यंदा मराठवाड्यातील साखर कारखाने सुरू होतील की नाही, अशी परिस्थिती असल्याने ५० हजार ऊसतोडणी मजुरांनी स्थलांतर केले आहे.
जालना जिल्ह्यातील मंठा, बदनापूर, जालना, अंबड, परतूर या तालुक्यांमधून किमान १० हजार लोकांनी मुंबई आणि पुणे तसेच औरंगाबाद येथे स्थलांतर केले आहे. काही मजूर रोजगाराच्या शोधात गुजरातमध्ये गेले आहेत.
परभणी जिल्ह्यातही यंदाच्या दुष्काळी परिस्थितीमुळे बिकट परिस्थिती आहे. ग्रामीण मजुरांच्या क्षेत्रात काम करणाऱ्या संस्थांच्या प्राथमिक सर्वेक्षणानुसार आतापर्यंत कामाच्या शोधात २० टक्के मजुरांचे स्थलांतर झाले आहे़ जिल्ह्यातून नाशिक येथे सर्वाधिक मजूर स्थलांतरित होतात़
लातूरच्या जिल्हाधिकाऱ्यांनी बांधकामांवर बंदी घातली आहे़ त्यामुळे २३ हजार बांधकाम मजुरांवर स्थलांतराची वेळ आली आहे़ लातूर एमआयडीसीत दररोज एक तास या हिशेबाने उद्योजकांना आठवड्यातून एकदा पाणी देण्यात येत आहे़
त्यामुळे दोन मोठे उद्योग गेल्या सहा महिन्यांपासून बंद पडले आहेत़ डाळ मिल आणि टेक्सटाइल या दोन उद्योगांचा यात समावेश आहे़ डाळ मिलमध्ये ३०० च्या आसपास आणि टेक्सटाइलमध्ये ३५० कामगार आहेत़
नांदेडमधील मजूर तेलंगण राज्यात स्थलांतरित होत आहेत़ जिल्ह्यात वेगवेगळ्या ५२८ कामांवर ४,३९५ मजूर काम करीत आहेत़ प्रशासन म्हणते की काम आहे पण मागणी नाही़ त्याचवेळी मजूर मात्र वेळेवर पैसे मिळत नसल्याच्या तक्रारी करीत स्थलांतर करीत आहेत़
(लोकमत न्यूज नेटवर्क)