श्रमदानातून शौचालय बांधण्यास पुढाकार घेणार- सदाभाऊ खोत
By admin | Published: April 17, 2017 10:38 PM2017-04-17T22:38:07+5:302017-04-17T22:38:07+5:30
गावे स्वच्छ आणि हगणदारीमुक्त करण्यासाठी राज्याचे पाणीपुरवठा आणि स्वच्छता राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी पुढाकार घेतला
ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि.17 - गावे स्वच्छ आणि हगणदारीमुक्त करण्यासाठी राज्याचे पाणीपुरवठा आणि स्वच्छता राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी पुढाकार घेतला आहे. त्यांनी स्वत: शौचालय निर्मितीसाठी श्रमदान करण्यास सुरुवात केली असून, सोलापूर जिल्ह्यापासून त्याची सुरुवात झाली आहे. राज्यातील निवडक भागात खोत हे स्वत: श्रमदानात सहभागी होणार आहेत. स्वच्छ गावांच्या निर्मितीसाठी शौचालय आणि शोषखड्डे बांधकामासाठी लोकांनीही पुढाकार घ्यावा, असे आवाहन खोत यांनी केले आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली राज्यात स्वच्छ भारत अभियानांतर्गत आतापर्यंत 106 तालुके आणि 14 हजार 470 ग्रामपंचायती हगणदारीमुक्त झाल्या आहेत. गेल्या वर्षी 19 लाख 40 हजार 996 शौचालये बांधण्यात आली आहेत. यावर्षी 25 लाख शौचालय बांधण्याचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले आहे. सिंधुदुर्ग, सातारा, कोल्हापूर, रत्नागिरी, वर्धा, सांगली आणि ठाणे या 7 जिल्ह्यांमध्ये कुटुंब तेथे शौचालय बांधण्यात आले आहे.
खोत यांनी 15 एप्रिलला वाशीम जिल्ह्यात शेलू बाजार, पेडगाव आणि 16 एप्रिलला बुलडाणा जिल्ह्यातील हातणी येथे स्वत: श्रमदान करून सकारात्मक संदेश राज्यातील जनतेला दिला आहे. शौचालय बांधणीच्या कामात उत्तम काम करणा-या ग्रामपंचायती व समाजसेवकांना सन्मानपत्र देऊन गौरविण्यात येणार आहे.
नूतन बनली स्वच्छतेची ब्रँड ॲम्बॅसिडर
मोताळा तालुक्यातील चिंचपूर येथील नूतन विष्णू धोरण या मुलीने आईकडे हट्ट करून शौचालय बांधण्याचे काम करून घेतले. त्यासाठी नूतनच्या आईने मंगळसूत्र विकले. हगणदारीमुक्तीच्या कार्याला प्रेरक असलेल्या नूतनचा यावेळी तिच्या आईवडिलांसह सत्कार करण्यात आला. त्याचप्रमाणे, नूतनला जिल्ह्याची स्वच्छता ब्रँड ॲम्बॅसिडर म्हणून घोषित करण्यात आले. नांदुरा तालुक्यातील खैरा येथील प्रमोद मनोहर वाघ या सलून व्यावसायिकाने शौचालय बांधलेल्या पुरूषांची दाढी, कटिंग वर्षभर विनामूल्य करण्याचा निर्णय घेतला आहे. त्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला.