महाराष्ट्रातील कापूस शेतीचा ताळेबंद तोट्यात
By Admin | Published: February 17, 2015 12:33 AM2015-02-17T00:33:41+5:302015-02-17T00:33:41+5:30
निसर्गाच्या अवकृपेमुळे पांढरं सोनं समजलं जाणाऱ्या कापसाचं उत्पादन एकरी अवघ्या ३ ते ४ क्विंटलवर येऊन ठेपल्याने कापूस शेतीचा ताळेबंद तोट्यात आला आहे.
ब्रह्मानंद जाधव- मेहकर
निसर्गाच्या अवकृपेमुळे पांढरं सोनं समजलं जाणाऱ्या कापसाचं उत्पादन एकरी अवघ्या ३ ते ४ क्विंटलवर येऊन ठेपल्याने कापूस शेतीचा ताळेबंद तोट्यात आला आहे. कापसाचा उत्पादन खर्च एकरी २३ हजार ३५० रुपये असून, उत्पन्न १८ हजार रुपयांपर्यंत होत आहे. खर्च जास्त व उत्पादन कमी होत असल्याने कापूस उत्पादक शेतकऱ्यांचं पांढरं सोनं मातीमोल झालं आहे.
पावसाच्या हुलकावणीमुळे खरीप हंगामातील पीक लागवडीची मुदत संपल्याने बहुतांश शेतकऱ्यांना कापसावरच अवलंबून राहावे लागले. त्यामुळे सन २०१३-१४ च्या कापूस हंगामाच्या तुलनेत सन २०१४-१५ च्या हंगामात कापसाची लागवड १० टक्क्यांनी वाढली. राज्यात सुमारे ४१ लाख हेक्टर क्षेत्रावर, तर विदर्भात सुमारे १७ लाख हेक्टर क्षेत्रावर कपाशी पेरणी करण्यात आली; परंतु पावसाने लांब दडी मारल्यामुळे राज्यातील ४१ लाख हेक्टरवरील कपाशी पिकाला फटका बसला आहे. पावसाच्या हुलकावणीबरोबरच कपाशी पिकावर पॅराविल्टसारख्या विविध भयावहरोगांचे आक्रमण मध्यंतरी झाले होते. परिणामी राज्यातील कापूस उत्पादनात ३० टक्के घट झाली. सद्य:स्थितीत कापूस वेचणीचा हंगाम शेवटच्या टप्प्यात असून, एकरी सुमारे ३ ते ४ क्विंटलच कापसाचे उत्पादन होत आहे. शेतकऱ्यांना कापसाला एकरी खर्च २३ हजार ३५० रुपये आला असून, उत्पन्न मात्र केवळ १८ हजार रुपयांपर्यंत होत आहे. त्यामुळे कापूस उत्पादनात शेतकऱ्यांना तोटा सोसावा लागत आहे. परिणामी शेतकऱ्यांचे आर्थिक नियोजन कोलमडले आहे.
४पश्चिम वऱ्हाडात शेतकरी सोयाबीनला पसंती देतात; परंतु यावर्षी मान्सून उशिरा आल्याने सोयाबीनच्या पेरणीची मुदत निघून गेली. त्यामुळे पश्चिम वऱ्हाडातील शेतकऱ्यांना कापसाकडे वळावे लागले. बुलडाणा जिल्ह्यात ७ हजार ८५० हेक्टर क्षेत्र, अकोला जिल्ह्यात ८ हजार ६७५ हेक्टर क्षेत्र, तर वाशिम जिल्ह्यात ६ हजार ७२५ हेक्टर क्षेत्रावर कपाशी पेरणी करण्यात आली; परंतु नैसर्गिक संकटामुळे पश्चिम वऱ्हाडातील तिन्ही जिल्ह्यातील
२३ हजार २५० हेक्टर क्षेत्रावरील कपाशी पिकाला फटका बसला.
कापसाला भाव मिळेना
४गत चार वर्षांपासून कापसाला भाव मिळत नसल्यामुळे कापूस उत्पादक शेतकऱ्यांना झळ सोसावी लागत आहे. यावर्षी कापसाला सरासरी ४ हजार रुपये भाव मिळत आहे. २०१३-१४ साली कापसाला सुमारे ३ हजार रुपये प्रति क्विंटल भाव मिळाला होता. त्याआधी सन २०१२-१३ मध्ये ३ हजार ५०० रुपये व सन २०११-१२ मध्ये ३ हजार रुपये असे दर होते. गत चार वर्षांपासून भाव मिळत नसल्याने शेतकरी आर्थिक विवंचनेत सापडला आहे.
कपाशीचा एकरी ताळेबंद
पूर्व मशागत१८०० रुपये
बियाणे१५०० रुपये
लागवड मजुरी७५० रुपये
खत४८०० रुपये
फवारणी मजुरी२५०० रुपये
फवारणी औषधी४५०० रुपये
आंतर मशागत३५०० रुपये
कापूस वेचणी४००० रुपये
एकूण खर्च२३३५० रुपये
सरासरी उत्पन्न४ क्विंटल
प्रति क्विं.दर४५०० रुपये
मिळकत१८००० रुपये
नुकसान५३५० रुपये