‘सत्ताधाऱ्यांमध्ये समन्वयाचा अभाव!’
By admin | Published: March 9, 2016 05:56 AM2016-03-09T05:56:55+5:302016-03-09T05:56:55+5:30
राज्य सरकारमधील घटक पक्षांमध्ये समन्वयाचा अभाव असल्याने बरेचदा चांगल्या निर्णयांबाबतही गैरसमज निर्माण होतात, असा टोला हाणत शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे
मुंबई : राज्य सरकारमधील घटक पक्षांमध्ये समन्वयाचा अभाव असल्याने बरेचदा चांगल्या निर्णयांबाबतही गैरसमज निर्माण होतात, असा टोला हाणत शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी समन्वयाची बैठक नियमित घेण्याचा सल्ला मंगळवारी दिला. अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वर्षा या शासकीय निवासस्थानी भाजपा-शिवसेना व मित्रपक्षांच्या आमदारांची बैठक झाली, त्यावेळी ठाकरे बोलत होते.
मुख्यमंत्री राज्याच्या हिताचे निर्णय घेत असल्याने आम्ही त्यांच्यासोबत आहोत, पण घटकपक्षांना विश्वासात घेण्याचा प्रयत्न नियमितपणे झाला पाहिजे, असे ठाकरे म्हणाल्याचे सूत्रांनी सांगितले. मुख्यमंत्री फडणवीस यांनी दुष्काळग्रस्तांना मदतीसह राज्य सरकारने घेतलेल्या लोककल्याणकारी निर्णयांची माहिती दिली. आपली सर्वांची मिळून शक्ती मोठी आहे.
ती उद्यापासूनच्या अधिवेशनातूनही दिसेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. युतीचे सरकार २५ वर्षही कोणी घालवू शकणार नाही, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. भाजपाचे प्रदेशाध्यक्ष खा. रावसाहेब दानवे यांनी, विरोधकांच्या आरोपांना उत्तरे देण्याची धमक आपल्यात आहे, असा विश्वास आमदारांना दिला. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते सदाभाऊ खोत यांनी शेतकऱ्यांचे निर्णय घेत असाल तर सरकारसोबत राहू, असा इशारा दिला. (विशेष प्रतिनिधी)