रोजगार क्षमतेचा देशात अभाव - अदी गोदरेज
By admin | Published: January 10, 2016 01:11 AM2016-01-10T01:11:08+5:302016-01-10T01:11:08+5:30
देशात अथवा राज्यात बेरोजगारीच्या समस्येपेक्षा तांत्रिक कौशल्याचा मोठा प्रश्न आहे. ही रोजगारक्षमता वाढविण्यासाठी गोदरेज उद्योग समूह प्रयत्न करत आहे, शिवाय मुंबईतल्या तिवरांच्या
मुंबई : देशात अथवा राज्यात बेरोजगारीच्या समस्येपेक्षा तांत्रिक कौशल्याचा मोठा प्रश्न आहे. ही रोजगारक्षमता वाढविण्यासाठी गोदरेज उद्योग समूह प्रयत्न करत आहे, शिवाय मुंबईतल्या तिवरांच्या संवर्धनासाठी देखील आम्ही प्रयत्न करत आहोत अशी माहिती गोदरेजचे अध्यक्ष अदी गोदरेज यांनी दिली.
ते राज्यपालांच्या पुढाकाराने आयोजित कार्यक्रमात बोलत होते. यावेळी राजभवनातील दरबार हॉल देशातल्या श्रीचंद हिंदुजा, एस. रामादुराई यांच्यासह अनेक प्रमुख उद्योजकांनी गच्च भरला होता. सगळ्यांनीच आपली कंपनी सीएसआर फंडाच्या माध्यमातून काय करत आहे याची माहिती दिली. रिलायन्स फाऊंडेशनच्या अध्यक्षा नीता अंबानी म्हणाल्या, आम्ही आजपर्यंत यामाध्यमातून ६०० कोटी रुपये खर्च केले आहेत. त्यातून १५ लाख लोकांना विविध प्र्रकारची मदत झाली आहे. राज्यात आमची भागीदारी आम्ही आणखी व्यापक करू, असेही त्यांनी सांगितले.
बिर्ला फाऊंडेशनच्या राजश्री बिर्ला म्हणाल्या, सीएसआरच्या माध्यमातून काम करण्याचा कायदा तर आत्ता झाला आहे, मात्र सामाजिक दायित्व जोपासण्याचे काम बिर्ला उद्योग समूह वर्षानुवर्षे करत आला आहे. तर रत्नागिरी, कर्जत, नागपूर आदी भागात केलेल्या कामांची माहिती पिरामल उद्योग समूहाच्या उर्वी पिरामल यांनी दिली. (प्रतिनिधी)