ठाण्यात सरकारी दुधाचा तुटवडा

By admin | Published: June 8, 2017 03:51 AM2017-06-08T03:51:06+5:302017-06-08T03:51:06+5:30

शेतकऱ्यांच्या संपामुळे १ जूनपासून ठाण्यात सुरू असलेला दुधाचा तुटवडा कायम आहे

Lack of government milk in Thane | ठाण्यात सरकारी दुधाचा तुटवडा

ठाण्यात सरकारी दुधाचा तुटवडा

Next


लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे : शेतकऱ्यांच्या संपामुळे १ जूनपासून ठाण्यात सुरू असलेला दुधाचा तुटवडा कायम आहे. बुधवारी ठाण्यात चक्क सरकारी दुधाचाच (महानंद) तुटवडा मोठ्या प्रमाणात जाणवल्याने विक्रेत्यांमध्ये तीव्र नाराजीचे वातावरण होते. संपूर्ण शहरात ४० टक्के दुधाचा तुटवडा असल्याने संध्याकाळी दूधखरेदी करणाऱ्या ग्राहकांना याचा मोठ्या प्रमाणात फटका बसल्याची माहिती विक्रेत्यांनी दिली.
१ जून रोजी महाराष्ट्रातील शेतकऱ्यांनी संपाची हाक दिल्यानंतर राज्यातील काही भागांत दूधविक्रेत्यांनीही या संपात सहभाग घेतला. या संपाच्या भीतीपोटी ठाण्यातील ग्राहकांनी दुपटीतिपटीने दूधखरेदी केले आणि त्या दिवशी संपूर्ण शहरात ३० ते ४० टक्के दुधाचा तुटवडा जाणवला. या दिवशी अचानक मागणी वाढल्याने दुधाची कमतरता जाणवली होती. दुसऱ्या दिवसापासून ग्राहकांची मागणी वाढली नसली, तरी आवक कमी झाली आणि आजपर्यंत हा तुटवडा शहरात जाणवत आहे. ठाण्यात मंगळवारी महानंदचे ५० टक्के, तर बुधवारी ८० टक्के दूध कमी आले. तसेच वारणा, गोकूळ यांच्याकडून नियमित दूध आले. अमुल २० टक्के, तर गोदावरीचे ३० टक्के दूध कमी आले. महानंद ही राज्य सरकारची डेअरी असतानाही त्यांच्याकडून दूध कमी येते. इतर कंपन्यांकडून मात्र नियमित दूध येत आहे.
नेमके काय चालले आहे, असा सवाल ठाण्यातील दूधविक्रेत्यांनी केला आहे. काही ग्राहक सकाळी तर काही ग्राहक संध्याकाळी दूध खरेदी करतात. सध्या शेतकरी संपामुळे दूध मिळणार नाही, अशी भीती ठाणेकरांना वाटत असल्याने दुधाची साठवणूक करण्याकडे ठाणेकरांचा कल वाढला आहे, असे विक्रेत्यांचे म्हणणे आहे.
शहरात दुधाचा खूपच तुटवडा जाणवल्याने वारणाकडून अधिक दूध घेतल्याचे ठाणे शहर दूध व्यावसायिक कल्याणकारी संस्थेचे सहसचिव पांडुरंग चोडणेकर यांनी सांगितले. बुधवारी सकाळी दुधाचा तुटवडा जाणवला नाही, मात्र संध्याकाळी ग्राहकांना टंचाई भेडसावली, असेही ते म्हणाले.

Web Title: Lack of government milk in Thane

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.