पालकत्व लाभूनही बुद्धघोष एकाकी!
By admin | Published: July 6, 2015 02:22 AM2015-07-06T02:22:16+5:302015-07-06T02:22:16+5:30
तिरोडा येथील भूकबळी प्रकरणातील अभागी महिलेच्या गतिमंद मुलाला गोंदियाच्या केटीएस जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले.
गोंदिया : तिरोडा येथील भूकबळी प्रकरणातील अभागी महिलेच्या गतिमंद मुलाला गोंदियाच्या केटीएस जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र सध्या त्याच्याजवळ कोणीच नसल्याने अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सकांनी गोंदिया शहर पोलीस निरीक्षकांना पत्र देऊन त्या मुलाला (बुद्धघोष) नागपूरच्या प्रादेशिक मनोरुग्णालयात घेऊन जाण्यास सूचविले आहे. सध्या आहे त्या अवस्थेत त्याला काही झाल्यास त्याची जबाबदारी आपली राहणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.
या प्रकरणात ललिता रंगारी यांचा मृत्यू झाल्यानंतर तिची दोन्ही मुले अनाथ झाली. या प्रकरणी राज्याचे सामाजिक न्यायमंत्री आणि गोंदियाचे पालकमंत्री राजकुमार बडोले यांनी दोन्ही मुलांचे पालकत्व स्वीकारले़ त्यानंतर चार दिवसांपूर्वी गतिमंद बुद्धघोषला गोंदियात उपचारासाठी आणण्यात आले. मात्र त्याच्या मामाचीही प्रकृती ठीक नसल्यामुळे सध्या त्याच्याजवळ कोणीच नातेवाईक नाही. अशा परिस्थितीत जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या डॉक्टरांनीही त्याची जबाबदारी घेण्यास नकार दिला आहे.
केटीएस रुग्णालयात दाखल केलेल्या गतिमंद बुद्धघोषसाठी चार कर्मचाऱ्यांची व्यवस्था केली होती. मात्र, प्रत्यक्षात ते कर्मचारी त्याची देखभाल करण्यास टाळाटाळ करीत आहेत. त्यामुळे अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सकांनी पोलिसांना पत्र देऊन त्याला नागपूरला हलविण्याचे सूचित केले आहे. जिल्हा सामान्य रुग्णालयात मानसिक आजाराने ग्रस्त रुग्णावर उपचारासाठी पुरेशी व्यवस्था नसल्याचे यावरून स्पष्ट होते.
बुद्धघोषला गतिमंदांच्या शाळेत पाठविले जाईल. सध्या त्याच्या देखभालीसाठी चार कर्मचाऱ्यांची ड्युटी लावली आहे. पालकमंत्र्यांच्या निर्देशानुसारच काम केले जात आहे. समाजकल्याण अधिकाऱ्यांशी याबाबत चर्चा करून पुढील निर्णय घेतला जाईल.
- डॉ. रवी धकाते,
जिल्हा शल्य चिकित्सक, गोंदिया