अवैध सावकाराच्या घरी लाखोंचे घबाड
By admin | Published: March 9, 2017 03:44 AM2017-03-09T03:44:24+5:302017-03-09T03:44:24+5:30
पथकाच्या धाडीत सोने, चांदी, रोख रकमेसह खरेदीखते जप्त
अकोला, दि. ८- अवैध सावकारीतून प्रचंड संपत्ती जमवल्याच्या गोपनीय तक्रारीवरून जिल्हाधिकार्यांनी नियुक्त केलेल्या पथकाने बायपास परिसरातील प्रकाश सुरडकर यांच्या घरी टाकलेल्या धाडीत प्रत्येकी सहाशे ग्रॅम सोने, चांदी, १८ खरेदीखत, नऊ पासबुक आणि कर्जाच्या नोंदवहय़ांसह दीड लाखांची रोख रक्कम बुधवारी सायंकाळी आढळली. गुरुवारपर्यंत फौजदारी कारवाईसाठी प्रकरण पोलिसांकडे दिले जाणार आहे.
अवैध सावकारी रोखण्यासाठी शासनाने गठित केलेल्या समितीने जिल्हय़ात केलेली ही पहिलीच कारवाई आहे. वाशिम बायपास परिसरातील प्रकाश दत्तुजी सुरडकर अवैध सावकारी करीत असल्याची तक्रार प्रशासनाकडे करण्यात आली. त्यावर जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांच्या निर्देशाने सहकार उपनिबंधक जी.जी. मावळे यांच्या मार्गदर्शनात गठित संयुक्त पथकाने बुधवारी सायंकाळी सुरडकर यांच्या घरी धाड टाकली. यावेळी केलेल्या तपासणीत घरात ६१९ ग्रॅम सोने, तेवढय़ाच वजनाचे चांदीचे दागिने, लोकांकडून करून घेतलेले खरेदीखत व इसारचिठ्ठय़ा १८, कर्जाच्या नोंदी असलेल्या वहय़ा, नऊ व्यक्तींच्या नावाच्या बँकांची पासबुक, १ लाख ४८ हजार ९0१ रुपयांची रोख रक्कम तसेच ४ कोरे धनादेश आढळून आली. सर्व कागदपत्रे, मुद्देमाल पथकाने जप्त केला. जिल्हाधिकारी अध्यक्ष असलेल्या समितीपुढे तो ठेवला जाणार आहे, तसेच अवैध सावकारी प्रकरण सिद्ध झाल्यास पोलीस कारवाई होण्याची शक्यता आहे.
पथकामध्ये जिल्हास्तरीय समितीचे सचिव जिल्हा उपनिबंधक जी.जी. मावळे, अकोला तालुका उपनिबंधक सुरेखा फुपाटे, अकोटचे शेकोकार, सातरोटे, खान, सतीश मारसट्टीवार, भाकरे, यांच्यासह नायब तहसीलदार महेंद्रकुमार आत्राम, सहायक पोलीस उपनिरीक्षक ठाकूर यांचा समावेश आहे. या पथकाने जप्त केलेल्या मुद्देमालासंदर्भात पुरावे सुरडकर यांना द्यावे लागणार आहेत. चौकशी अहवालानंतर फौजदारी कारवाईसाठी प्रकरण पोलिसांकडे जाणार आहे.
राज्यातील पहिलीच कारवाई
शासनाने अवैध सावकारी करणारांवर कारवाई करण्यासाठी जिल्हास्तरीय समितीचे गठन करण्याचे आदेश २ मार्च २0१७ रोजी दिले आहेत. त्यामध्ये समिती अध्यक्ष जिल्हाधिकारी, सदस्य पोलीस अधीक्षक तर सचिव म्हणून उपनिबंधक आहेत. शासन आदेशाने ही समिती गठित झाल्यानंतर राज्यात झालेली ही पहिलीच कारवाई असल्याची माहिती आहे.
सुरडकर यांच्या घरातून जप्त केलेल्या कागदपत्रांची पडताळणी सुरू आहे. त्यामध्ये बर्याच बाबी नियमबाहय़ आहेत. त्यानुसार कारवाईसाठी उद्या दुपारपर्यंत पोलिसांत प्रकरण दिले जाईल.
जी.जी. मावळे,
सचिव, जिल्हास्तरीय समिती.