बहुरूपी लोककला काळाच्या ओघात लोप
By Admin | Published: November 19, 2016 03:12 AM2016-11-19T03:12:31+5:302016-11-19T03:12:31+5:30
महाराष्ट्रात बहुरूपी कला श्री शिवाजी महाराजांच्या काळापासून चालू झाली होती.
गिरीश गोरेगावकर,
माणगाव- महाराष्ट्रात बहुरूपी कला श्री शिवाजी महाराजांच्या काळापासून चालू झाली होती. मात्र सध्या काळाच्या ओघात ही बहुरूपी कला लोप पावत आहे. माणगाव येथे बहुरूपी कलाकार अर्जुन सुदाम शेगर (रा.येळापूर, ता.माळशिरस, जि.सोलापूर) हे पोलीस वेशात बाजारपेठेच्या प्रत्येक दुकानात जाऊन पोलिसी खाक्या दाखवत फिरत होते. खरच की काय पोलीस आले आपल्या दुकानात चौकशीला आले असे दुकानदाराला वाटत होते. त्यामुळे काही काळ नागरिकांसह दुकानदार देखील हैराण झाले. परंतु आजच्या या धावपळीच्या जगात अर्जुन सुदाम शेगर यांनी ही कला जिवंत ठेवल्याने साऱ्यांनी त्यांचे कौतुक के ले.
महाराष्ट्रात बहुरूपी लोककला जागरूकता शिवाजी महाराजांपासून खूप मोठ्या प्रमाणात होऊ लागली होती. सद्यपरिस्थितीत ही कला लोप पावत असलेली दिसत आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात बहुरूपी हेरिगिरीचे काम चोख बजावत असत. म्हणून त्यांना खबरी म्हणत. नंतरच्या काळात पोलिसांना मदत म्हणून सीआईडीचे काम सुद्धा बहुरूपी कलाकारांनी केल्याचे दिसले आहे. बहुरूपी कलाकार गावागावात जाऊन राम, लक्ष्मण, हनुमंत, पोलीस,वकील आशा विविध रु पांचे सोंग घेऊन फिरत असत. असे कार्यक्र म एका गावात आठ आठ दिवस राहून करीत असत. गावातील चोरी, भानगडी आदी गावातील माहिती ही बहुरूपी पोलिसांना देत असत. पोलिसांना याची नेहमी गुन्ह्यामध्ये मदत होई.
सद्यपरिस्थितीत बहुरूपी कलाकारांना सध्याची पिढी ओळखत सुद्धा नाही. तरीपण ही परंपरा जिवंत ठेवण्याचे काम अर्जुन सुदाम शेगर हे करीत आहेत. काही लोक बहुरूपी कलेला नावं ठेवतात.
>मागणी : हे कलाकार वर्षातून दोन महिने बहुरूपीचे काम करतात. नंतर उर्वरित महिने मोलमजुरी करून उदरनिर्वाह करीत असतात. आमच्या कलेची दाद देऊन काही प्रमाणात मानधन देण्यात यावे, अशी या कलाकारांची मागणी आहे