सुधागडात पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांचा अभाव
By admin | Published: August 6, 2016 02:46 AM2016-08-06T02:46:11+5:302016-08-06T02:46:11+5:30
अतिवृष्टीमुळे जनावरांमध्ये साथीच्या रोगांचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे तालुक्यातील शेतकऱ्यांना आपल्या पशुधनावर उपचारांसाठी पाली गाठावे लागत आहे
पाली : अतिवृष्टीमुळे जनावरांमध्ये साथीच्या रोगांचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे तालुक्यातील शेतकऱ्यांना आपल्या पशुधनावर उपचारांसाठी पाली गाठावे लागत आहे.
सुधागड तालुक्यात जशी प्राथमिक आरोग्य केंद्राची अवस्था आहे तशीच किंवा किंबहुना वाईट अवस्था येथील पशुवैद्यकीय दवाखान्यांची आहे. सुधागड तालुक्यात एकूण ६ दवाखाने असून प्रथम श्रेणी दवाखाने पाली, जांभुळपाडा आणि चव्हाणवाडी येथे तर द्वितीय श्रेणी दवाखाने खवली, नांदगाव आणि वाघोशी येथे आहेत. परंतु या सर्व दवाखाने मिळून फक्त दोन ठिकाणी डॉक्टर उपलब्ध असल्याने अन्य चार ठिकाणच्या शेतकऱ्यांना आपल्या जनवारांच्या उपचारासाठी फार त्रेधातिरपीट करावी लागत आहे.
शेतकरी आपल्या पशुधनाला घरातल्या मुलाप्रमाणे सांभाळ करत असतो. एखादा जरी पशू आजारी पडले तरी घरातील लहान मोठ्यांपासून सर्वांचीच तळमळ होते. शासन एकीकडे शेतकरी जगला पाहिजे म्हणून प्रयत्नशील असताना शेतीला जोडधंदा म्हणून पशुधनाकडे पाहिले जाते परंतु सुधागड तालुक्यात मात्र असे होताना दिसत नाही.
मागच्याच आठवड्यात घेरा सुधागड येथे थंडीने गारठून १६ जनावरे दगावल्याची घटना ताजी असताना प्रशासनाकडून कोणतीही खबरदारी घेतल्याची पहायला मिळाली नाही. पालीचे उपसरपंच सचिन जवके आपल्या दुभत्या जनावरांच्या उपचारासाठी पाली येथे आले तेव्हा पाली दवाखान्यात कोणीच उपस्थित नव्हते. याबाबत पाली येथील गटविकास अधिकारी यांना विचारणा केली असता त्यांना कोणतेच प्रश्नावर समाधानकारक उत्तर देता आले नाही. प्रशासनाच्या भोंगळ कारभारामुळे शेतकऱ्यांनी कोठे जायचे हा प्रश्न आहे. पशू विभागातर्फे राबवण्यात येणाऱ्या विविध योजना यानिमित्ताने दुर्लक्षित राहत असल्याचे समोर येत आहे.
>शासनाने पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांच्या नियुक्त्या न केल्याने जिल्ह्यात अनेक ठिकाणी या जागा रिक्त असून आपल्या तालुक्याचा तळा येथील पशुवैद्यकीय अधिकाऱ्याकडे चार्ज दिलेला असून त्यांच्याकडून सुधागडसाठी वार नेमून घेतले जातील.
- संजय भोये,
गटविकास अधिकारी, सुधागड