लाड यांना विधान परिषदेचा प्रसाद, माधव भंडारींना धक्का, काँग्रेसतर्फे दिलीप माने यांनी भरला अर्ज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 28, 2017 06:22 AM2017-11-28T06:22:57+5:302017-11-28T06:23:12+5:30
विधान परिषदेच्या पोटनिवडणुकीसाठी भाजपाचे निष्ठावंत आणि मुख्य प्रवक्ते माधव भंडारी यांना डावलून राष्ट्रवादीतून पक्षात आलेले आणि अल्पावधीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्ती बनलेले प्रसाद लाड यांना
विशेष प्रतिनिधी
मुंबई : विधान परिषदेच्या पोटनिवडणुकीसाठी भाजपाचे निष्ठावंत आणि मुख्य प्रवक्ते माधव भंडारी यांना डावलून राष्ट्रवादीतून पक्षात आलेले आणि अल्पावधीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्ती बनलेले प्रसाद लाड यांना भाजपाने उमेदवारी दिल्याने अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला.
७ डिसेंबरला होणा-या विधान परिषदेच्या पोटनिवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी सोमवार शेवटचा दिवस होता. भाजपाकडून मुख्य प्रवक्ते माधव भंडारी यांना उमेदवारी मिळेल, अशी शक्यता वर्तविण्यात येत होती. मात्र उमेदवारी कोणाला द्यायची यावर रविवारी रात्रभर भाजपामध्ये खल झाला. मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानी पहाटेपर्यंत बैठकांचे सत्र सुरू होते. प्रसाद लाड यांनी रात्रीतून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा पाठिंबा मिळवून बाजी मारल्याने अखेर लाड यांच्या गळ्यात उमेदवारी पडली. यापूर्वी मनसेतून आलेले प्रवीण दरेकर, काँग्रेसी नेत्यांशी जवळीक असलेले आर.एन. सिंह या नेत्यांना भाजपाने विधान परिषदेची संधी दिली आहे. लाड हेही राष्टÑवादीतून आलेले आहेत.
लाड यांना शिवसेनेने पाठिंबा दिल्याने त्यांचा विजय निश्चित मानला जात आहे. असे असले तरी ‘प्रत्यक्ष मतदानाच्या वेळी अदृश्य ‘बाण’ (शिवसेना) चमत्कार करेल,’ असे सांगत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी लाड यांच्या विजयाबाबत शंका घेणारे पिल्लू सोडले आहे.
अशी ठरली उमेदवारी
भाजपाचा उमेदवार ठरविण्यासाठी चार दिवसांपूर्वी झालेल्या बैठकीत माधव भंडारी, प्रसाद लाड यांच्यासह चार नावांवर चर्चा झाली होती. मात्र, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष खा. दानवे आणि इतर काही नेत्यांनी काल रात्री झालेल्या बैठकीत लाड यांचे नाव निश्चित केले. लाड यांनी रात्रीच मातोश्रीवर जाऊन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे आशीर्वाद घेतले.
विजय निश्चित
विधानसभेतून विधान परिषदेवर निवडून द्यावयाच्या या एका जागेसाठी संख्याबळाचा विचार करता लाड यांचा विजय निश्चित आहे. भाजपाचे १२२ व शिवसेनेचे ६३ असे १८५ संख्याबळ लाड यांच्या पाठीशी आहे. अपक्ष व लहान पक्षांचे मिळून किमान १५ आमदार भाजपासोबत आहेत. दुसरीकडे काँग्रेसचे ४२, राष्ट्रवादीचे ४१ असे एकूण ८३ संख्याबळ होते. लहान पक्षांपैकी काहींनी त्यांना पाठिंबा दिला तरी मतांची शंभरी गाठणेही अशक्य आहे.
..तर शिवसेनेची मते फुटली असती : राणे
भाजपाने मला उमेदवारी दिली असती तर शिवसेनेची मते फुटली असती आणि मी जिंकलो असतो, असा दावा महाराष्टÑ स्वाभिमान पक्षाचे नेते नारायण राणे यांनी केला. ते म्हणाले, माझ्याविरोधात काँग्रेस, राष्टÑवादी व शिवसेना एकत्र आले, यातच माझा विजय आहे.