बुडत्याला काडीचा आधार
By admin | Published: March 24, 2017 02:13 AM2017-03-24T02:13:57+5:302017-03-24T02:13:57+5:30
आर्थिक संकटात असलेल्या बेस्ट उपक्रमाने नुकताच वीज कंपनीचे देय थकवून कामगारांचे पगार दिले. त्यामुळे
मुंबई : आर्थिक संकटात असलेल्या बेस्ट उपक्रमाने नुकताच वीज कंपनीचे देय थकवून कामगारांचे पगार दिले. त्यामुळे पालक संस्था असलेल्या महापालिकेनेही मोठे मन दाखवून बेस्ट उपक्रमाचे धूम्रफवारणीपोटी थकीत १ कोटी २२ लाख रुपये माफ केल्याने बेस्टला दिलासा मिळाला आहे.
महापालिका पालक संस्था असली तरी बेस्ट उपक्रमालाही देण्यात येणाऱ्या सेवांचे शुल्क वसूल करण्यात येत असते. विद्युत वाहिन्या टाकणे, जाहिरात फलक, वसाहतींमध्ये धूम्रफवारणी अशा सेवांसाठी बेस्ट उपक्रमाला कोट्यवधी रुपये आकारले जात असतात. मात्र यापैकी काही कामे गरजेची असली तरी त्याची बिले चुकती करणे बेस्ट उपक्रमाच्या आवाक्याबाहेर गेलेले आहे.
आर्थिक संकटात असलेल्या बेस्ट उपक्रमाने या सवलतींसाठी आकारण्यात येणाऱ्या शुल्कांमध्ये सूट मिळण्याची मागणी अनेकवेळा
केली आहे.
बेस्टच्या मालमत्ता व वसाहतींमध्ये पालिकेकडून धूम्रफवारणी केल्यानंतर त्याचे शुल्क महापालिका वसूल करीत असते. गेल्या दीड वर्षांत १ कोटी २२ लाख रुपये पालिकेला देणे बाकी होते. यामध्ये सूट मिळण्यासाठी पालिकेकडे वारंवार पत्रव्यवहार केल्यानंतर दीड वर्षाने दखल घेत बेस्टला दिलासा दिला आहे.
आर्थिक संकटात असलेल्या बेस्ट उपक्रमाला इतर सेवांमध्येही सवलत द्यावी, अशी सूचना नगरसेवकांनी केली आहे. (प्रतिनिधी)