लाडका भाऊ योजना ५० वर्षांपूर्वीची? दानवेंच्या दाव्याने शिवसेनेत 'खळबळ', विरोधक कामाला लागले
By ऑनलाइन लोकमत | Published: July 18, 2024 02:14 PM2024-07-18T14:14:51+5:302024-07-18T14:15:18+5:30
आदित्य ठाकरेंनी लाडका भाऊ योजना पण सुरु करावी असा मुद्दा काढताच शिंदेंनी त्यांना पलटवार करत लाडक्या भावासाठी देखील योजना आणली असल्याचे म्हटले होते.
राज्याच्या अर्थसंकल्पामध्ये लाडकी बहीण आणि लाडका भाऊ अशा अनुदान देण्याच्या योजना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सरकारने जाहीर केल्या आहेत. यावरून आता राज्यात विरोधक आणि सत्ताधाऱ्यांत लढाऊ रंगली आहे. आदित्य ठाकरेंनी लाडका भाऊ योजना पण सुरु करावी असा मुद्दा काढताच शिंदेंनी त्यांना पलटवार करत लाडक्या भावासाठी देखील योजना आणली असल्याचे म्हटले होते. आता यावर ठाकरे गटाचे विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी खळबळजनक दावा केला आहे.
मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलेली लाडका भाऊ योजना निव्वळ तरुणांची फसवणूक आहे, असे ते म्हणाले आहेत. ही योजना १९७४ पासून महाराष्ट्रात सुरू आहे. सगळ्या योजनांना रोजगार प्रोत्साहन, प्रशिक्षण पहिल्यापासून दिलेले आहे. या योजनेमध्ये नवीन काही नाही. सरकार जनतेची आणि तरुणांची फसवणूक करत आहे, असा आरोप दानवे यांनी केला आहे.
जुन्याच योजना मुख्यमंत्र्यांच्या नावाने सुरू करून नवीन दाखविण्यात येत आहेत. तरुण पिढीने या योजनेच्या नावाला फसू नये. यांना निवडणुकीच्या तोंडावर लाडका भाऊ , लाडकी बहीण आठवू लागले आहे. प्रत्यक्षात या योजना जुन्याच आहेत, असा दावा दानवे यांनी केला आहे.
तर यावर शिवसेनेचे प्रवक्ते अरुण सावंत यांनी दानवे यांच्यामार्फत मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलेल्या योजनांचा खोटा प्रचार सुरू असल्याची टीका करण्यात आली आहे. विरोधी पक्षनेते यांना अजून 'आव्हान' आणि 'आवाहन' यातील फरक कळत नाही, असा टोलाही सावंत यांनी लगावला आहे.
लाडक्या बहीणीला देखील 5 हजारांच्यावर पैसे द्या - यशोमती ठाकूर
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लाडका भाऊ योजना जाहीर केली आहे. या योजनेत त्यांनी सहा, आठ आणि बारा हजार असे मानधन देणार असल्याचे जाहीर केले आहे. लाडक्या भावाला सहा, आठ आणि बारा हजार देताय तर लाडक्या बहीणीला पंधराशे का? महिलांची किंमत एवढी कमी आहे का? असा सवाल करत महिलांना देखील 5 हजारांच्यावर पैसे द्यावेत अशी मागणी काँग्रेसच्या आमदार यशोमती ठाकूर यांनी केली आहे.