बँकेमुळे विदेशात गेलेली ‘लेक’ परतीच्या मार्गावर
By admin | Published: February 12, 2017 11:08 PM2017-02-12T23:08:59+5:302017-02-12T23:08:59+5:30
लेक वाचवा, लेक शिकवा या ब्रीद वाक्याखाली राज्यात मुलींच्या शिक्षणासाठी विविध उपक्रम राबवत असतानाच, नंदुरबार तालुक्यातील रनाळे येथून परदेशात शिक्षणासाठी गेलेल्या रूची चव्हाण
नंदुरबार : लेक वाचवा, लेक शिकवा या ब्रीद वाक्याखाली राज्यात मुलींच्या शिक्षणासाठी विविध उपक्रम राबवत असतानाच, नंदुरबार तालुक्यातील रनाळे येथून परदेशात शिक्षणासाठी गेलेल्या रूची चव्हाण हिच्या शिक्षणात गावातील युनियन बँक अडथळा ठरत आहे़ गेल्या पाच महिन्यांपासून तिच्या पालकांना बँक कर्ज देत नसल्याने तिचे शिक्षण धोक्यात आले आहे़
रनाळे येथील जितेंद्र चंदुलाल चव्हाण (तांबोळी) यांची मुलगी रूची चव्हाण बारावीच्या वर्गातून गेल्यावर्षी उत्तीर्ण झाल्यानंतर १६ सप्टेंबर २०१६ रोजी रशियातील पेंझा युनिवर्सिटी येथे वैद्यकीय शिक्षण घेण्यासाठी रवाना झाली़ रवाना होण्यापूर्वी रनाळे पंचक्रोशीतून तिचा गौरव करण्यात आला होता़ या भागातून प्रथमच एक कन्या परदेशात शिक्षणासाठी जात असल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त करत तिचे कौतूक केले होते़ तिच्या पालकांनी तिचे शिक्षण पूर्ण करण्यासाठी गावातीलच युनियन बँक आॅफ इंडियाच्या शाखेत कर्जासाठी अर्ज केला होता़ रूची ही परदेशात रवाना होण्यापूर्वी बँकेने तिला शैक्षणिक कर्ज देण्याची तयारी दर्शवली होती़ मात्र रूची परदेशात रवाना झाल्यानंतर बँकेने तिचे आजोबा आणि वडील या दोघांसमोर जाचक आणि पूर्ण न होणाऱ्या अटी समोर ठेवत कर्ज देण्याची तयारी दर्शवल्यानंतर समस्यांना सुरूवात झाली आहे़ सप्टेंबर महिन्यापासून बँकेत चकरा मारणाऱ्या रूचीच्या आजोबांना जानेवारी महिन्यात रक्तदाबाचा विकार उद्भवला होता़ येत्या मार्च महिन्यात या बँकेकडून कर्ज न मिळाल्यास वैद्यकीय शिक्षण अर्ध्यावरच बंद करून संबधित विद्यापीठ रूची हिला घरी पाठवणार असल्याची माहिती देण्यात आली आहे़ बँकेने कर्ज द्यावे, यासाठी गेल्या दोन महिन्यांपासून तिचे वडील जितेंद्र चव्हाण व तिची आई ज्योती यांनी प्रशासन आणि बँक यांनी उंबरठे झिजवत ‘लेक वाचवा लेक शिकवा’ची जिद्द कायम ठेवली आहे़