सव्वा महिन्याने सुरू झाला तलाव
By Admin | Published: May 14, 2014 05:57 AM2014-05-14T05:57:07+5:302014-05-14T05:57:07+5:30
ऐन उन्हाळ्यात दुरुस्तीसाठी थेरगाव येथील कांतिलाल खिंवसरा- पाटील जलतरण तलाव बंद ठेवल्याने महापालिकेचा लाखो रुपयांचा महसूल बुडाला आहे.
पिंपरी : ऐन उन्हाळ्यात दुरुस्तीसाठी थेरगाव येथील कांतिलाल खिंवसरा- पाटील जलतरण तलाव बंद ठेवल्याने महापालिकेचा लाखो रुपयांचा महसूल बुडाला आहे. अखेर सव्वा महिन्यानंतर तलाव खुला झाल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले. यासंदर्भात ‘लोकमत’ने वारंवार पाठपुरावा करून तलाव सुरू करण्याची भूमिका मांडली होती. ऐन हंगामात तलाव दुरुस्तीसाठी बंद ठेवून नागरिकांची गैरसोय होत होती. तसेच, महापालिकेचे लाखो रुपयांचे उत्पन्न बुडत असल्याचे विविध वृत्तांतून वाचा फोडली होती. त्याची दखल घेत महापालिकेने १० मे रोजी तलाव पोहण्यास खुला केला. तलावातील फरशा उखडल्याने तुटल्या होत्या. त्यामुळे नागरिकांच्या पायास जखमा होत होत्या. तसेच, तलावातून पाण्याची गळती होत होती. शिडी तुटली होती. या संदर्भात अनेक तक्रारी करूनही स्थापत्य विभागाने दखल घेतली नाही. ऐन उन्हाळ्यात १ एप्रिलपासून स्थापत्य विभागाने दुरुस्ती काम हाती घेतले. हे काम तात्पुरते केले गेले आहे. उन्हाळ्याचा हंगाम वाया जाऊ नये म्हणून तात्पुरती दुरुस्ती करीत तलाव खुला केला. एकूण ४० दिवस तलावास टाळे होते. या काळात महापालिकेचे लाखो रुपयाचे उत्पन्न बुडाले. बंद काळात दोन प्रशिक्षण शिबिरे मोहननगर व पिंपळे गुरव येथील तलावावर स्थलांतरित केली. दुरुस्ती करूनही गळती होत असल्याने बेबी टँक बंदच आहेत. उन्हाळा संपण्यास १५ दिवस शिल्लक आहे. जूनच्या पहिल्या आठवड्यापासून पावसाचे वेध लागतात. या काळात पोहण्याचे प्रमाण नगण्य असते. पावसाळ्यात काम करता येत नसल्याने हिवाळ्यात तलावाचे संपूर्ण दुरुस्ती काम केले जाणार आहे. त्या काळात पुन्हा तलाव बंद ठेवावा लागणार आहे, असे तलावाचे लिपिक विनय चौधरी यांनी सांगितले. (प्रतिनिधी)