यात्रेसाठी उकळले लाखो रुपये
By admin | Published: May 17, 2016 03:44 AM2016-05-17T03:44:37+5:302016-05-17T03:44:37+5:30
एजंटने लाखो रुपये उकळल्याप्रकरणी त्याच्याविरोधात बाजारपेठ पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे.
कल्याण : उमरा यात्रेसाठी कल्याणमधील मुस्लिमांकडून जावेद हबीब (रा. ठाणे) या एजंटने लाखो रुपये उकळल्याप्रकरणी त्याच्याविरोधात बाजारपेठ पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे. मात्र, पोलिसांनी कोणतीही कारवाई केली नसल्याचा आरोप तक्रारदारांनी केला आहे.
पश्चिमेतील मुस्लिम वस्तीत राहणाऱ्या रजिया शेख या कोंथिबीर, कढीपत्ता विकतात. तर, त्यांचे पती मौला हेदेखील मोलमजुरी करून कुटुंबाचा सांभाळ करीत आहेत. रजिया यांच्या घरी कर्नाटकहून त्यांची नणंद जुबेदा गौसव, त्यांचे पती अब्दुल गौस आले होते. उमरा या धार्मिक यात्रेला जाण्याचा आग्रह त्यांनी रजिया यांच्याकडे धरला. त्यामुळे त्यांनी पोटाला चिमटा काढून काही पैसे साठवले होते. जुबेदा, अब्दुल, सासू जुलेखा व मौला यांच्या तिकिटांची व्यवस्था केली. त्यासाठी त्यांनी हबीब याच्याकडे पाच जणांचे २ लाख ४५ हजार रुपये ११ महिन्यांपूर्वी भरले होते.
रजिया यांच्याप्रमाणेच साबण विकणारे सलीम मेमन यांनीही हबीब यांच्याकडे ११ महिन्यांपूर्वी उमरा यात्रेसाठी मुलगा तरबेज आणि पत्नी जुलेखा यांचे एक लाख ९० हजार रुपये भरले होते. चार घरची धुणीभांडी करून पैसे गोळा करणाऱ्या वृद्ध महिला हलिमा हाजी कच्छी यांनीही पैसे जमवून उमरा यात्रेची मनीषा बाळगली होती.
त्यासाठी त्यांनी ४५ हजार रुपये हबीब याच्याकडे भरले होते. मुंबईतील डोंगरी परिसरात राहणारे मुसा पडाया, त्यांचा मुलगा साबीर आणि मोहम्मद यांच्या तिकिटांसाठी एक लाख ३५ हजार रुपये हबीबकडे भरले होते. या सगळ्यांची फसवणूक करून हबीब पसार झाला आहे. कल्याणप्रमाणेच त्याने मुंब्रा, ठाणे परिसरातील उमरा यात्रेकरूंना गंडा घातल्याचे सांगण्यात येत आहे.
हबीबने या सगळ्यांना बोगस विमान तिकिटे दिली होती. एका ए-फोर साइजच्या कोऱ्या कागदावर तिकिटाची डुप्लिकेट प्रिंट काढून दिली होती. प्रत्यक्षात त्याने त्यांचे तिकीट काढलेले नव्हते.
१३ मे रोजी सांताक्रूझ विमानतळावरून उमराला जाण्यासाठी विमान असेल, असे हबीबने सांगितले होते. त्यासाठी ११ मे रोजी मेमन यांनी त्याच्याशी संपर्क साधला असता त्याने १२ वाजता दुपारी देतो, असे सांगितले. १२ मेपासून हबीबचा फोन लागत नाही. तो कव्हरेज क्षेत्राच्या बाहेर असून हा नंबरच उपलब्ध नसल्याची संगणकीय टेप ऐकायला मिळत आहे. फसवणूक झालेल्या मंडळींनी हबीबच्या ठाण्यातील घरी मोर्चा वळवला. तेव्हा त्याच्या पत्नीने माझे पती दोन दिवसांपासून घरीच आलेले नाहीत. त्यामुळे आम्ही त्यांचा शोध घेत आहोत, असे सांगितले. (प्रतिनिधी)