लोकलमध्ये विसरल्या सव्वा लाखाच्या लेन्स
By admin | Published: September 29, 2016 03:59 AM2016-09-29T03:59:59+5:302016-09-29T03:59:59+5:30
मुंबई उपनगरीय लोकलमधून प्रवास करताना अनेक प्रवासी आपल्या मौल्यवान वस्तू विसरतात आणि ती वस्तू शोधण्याचे कर्तव्य लोहमार्ग पोलिसांना पार पाडावे लागते. अशाच एका घटनेत
मुंबई : मुंबई उपनगरीय लोकलमधून प्रवास करताना अनेक प्रवासी आपल्या मौल्यवान वस्तू विसरतात आणि ती वस्तू शोधण्याचे कर्तव्य लोहमार्ग पोलिसांना पार पाडावे लागते. अशाच एका घटनेत एक प्रवासी सव्वा लाख किमतीचे डोळ्याचे लेन्स असलेली बॅग विसरले. त्यानंतर या बॅगेचा शोध घेत लोहमार्ग पोलिसांनी ती बॅग पुन्हा प्रवाशाला परत मिळवून दिली.
मंगळवारी सायंकाळी ४.१0 वाजता धनराज जाधव या प्रवाशाने विलेपार्ले स्थानकातून दादरला जाण्यासाठी चर्चगेट लोकल पकडली. त्या वेळी सोबत डोळ्याच्या लेन्सची असलेली २५ पाकिटांची बॅग डब्यातील रॅकवर ठेवली. दादर स्थानकात उतरल्यानंतर बॅग लोकलमध्ये विसरल्याचे लक्षात आले. त्वरित त्यांनी मागूनच आलेली चर्चगेट लोकल पकडली आणि चर्चगेट स्थानक गाठले. तेथे उभ्या असणाऱ्या लोकलमध्ये बॅग शोधूनही ती न सापडल्याने अखेर जाधव यांनी लोहमार्ग पोलिसांच्या हेल्पलाइनवर संपर्क साधला आणि सर्व माहिती दिली.
त्यानंतर हेल्पलाइनमधून वांद्रे रेल्वे पोलीस ठाण्याला घटनेची माहिती देण्यात आली. पोलिसांनी चर्चगेट-अंधेरी लोकल वांद्रे स्थानकात येताच बॅगेची शोधाशोध सुरू केली असता ती बॅग याच लोकलमध्ये सापडली. बॅगेत असणाऱ्या साहित्याची खातरजमा केल्यानंतर ती जाधव यांना सुपुर्द केली. (प्रतिनिधी)