गुंतवणूकदारांना कोट्यवधीचा गंडा
By admin | Published: August 24, 2015 12:45 AM2015-08-24T00:45:10+5:302015-08-24T00:45:10+5:30
कंपन्यांची मोबाइल एसएमएसद्वारे आॅनलाइन जाहिरात करण्यासाठी दामदुप्पट पैसे मिळण्याचे आमिष दाखवून चेन्नई येथील चौघा भामट्यांनी सहा जिल्ह्यांतील दीड हजारांपेक्षा
कोल्हापूर : कंपन्यांची मोबाइल एसएमएसद्वारे आॅनलाइन जाहिरात करण्यासाठी दामदुप्पट पैसे मिळण्याचे आमिष दाखवून चेन्नई येथील चौघा भामट्यांनी सहा जिल्ह्यांतील दीड हजारांपेक्षा जास्त गुंतवणूकदारांना कोट्यवधींचा गंडा घातल्याचे शनिवारी उघडकीस आले. या प्रकाराची माहिती गुंतवणूकदारांना समजताच त्यांनी न्यू शाहूपुरीतील कार्यालयाची तोडफोड केली.
पोलिसांनी संशयित आरोपी संदीप रेड्डी, वेल कृष्णन, चैतन्य, कुमार पांडे (सर्व रा. सेंट मेरी रोड, पेराम्बूर, चेन्नई) यांच्या विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.
या चौघांनी १ जून २०१५ रोजी न्यू शाहूपुरी परिसरातील शारदा चेंबर्समध्ये पहिल्या मजल्यावरील कार्यालयात ‘व्हिजन मीडिया आयटी सोल्युशन फर्म’ नावाने कंपनी सुरू केली. या वेळी आठ तरुणींची
नेमणूक केली. जगभरातील १९ कंपन्यांचे आॅनलाइन जाहिरातीचे टेंडर घेतल्याचे सांगून त्यांनी कोल्हापूरसह सांगली, सातारा, रत्नागिरी,
सिंधुदुर्ग, नाशिकमधील गुंतवणूकदारांना पंधरा दिवसांत दामदुप्पट पैसे मिळविण्याची भुरळ घातली. त्यांच्या या
आमिषाला सुमारे दीड हजारांपेक्षा जास्त तरुणांनी एसएमएस सेंडिंग वर्कसाठी ५०० रुपयांपासून ते १ लाखापर्यंत गुंतवणूक केली.
परंतु, अखेर फसवणूक झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. (प्रतिनिधी)