लाखोंची मांदियाळी हरिचरणी लीन
By admin | Published: February 8, 2017 05:10 AM2017-02-08T05:10:08+5:302017-02-08T05:10:08+5:30
सावळ्या विठुरायाच्या भेटीची आस मनी घेऊन माघवारीसाठी महाराष्ट्रासह कर्नाटक, आंध्रप्रदेश, तेलंगणा येथील तीन लाखांपेक्षा अधिक भाविक आज हरिचरणी लीन झाले.
पंढरपूर : सावळ्या विठुरायाच्या भेटीची आस मनी घेऊन माघवारीसाठी महाराष्ट्रासह कर्नाटक, आंध्रप्रदेश, तेलंगणा येथील तीन लाखांपेक्षा अधिक भाविक आज हरिचरणी लीन झाले.
मंगळवारी माघवारी असल्याने पांडुरंगाचे दर्शन घेऊन भाविकांनी हा सुखसोहळा डोळ्यात साठविला़ पदस्पर्श दर्शनरांग गोपाळपूर रस्त्यावरील मंदिर समितीच्या पत्राशेडच्या पुढे तात्पुरत्या पत्राशेडपर्यंत तर मुखदर्शनाची रांग तुकाराम भवनच्या पाठीमागे संभाजी चौकापर्यंत गेली होती़ पददर्शन, मुखदर्शन, नामदेव पायरी आणि कळसाचे दर्शन घेण्यासाठी झुंबड उडाली होती. माघवारीसाठी आलेल्या ४१२ दिंड्यांतील वारकऱ्यांनी ‘ज्ञानोबा-तुकाराम’चा जयघोष करीत प्रदक्षिणा पूर्ण केली़ दर्शन घेतलेले वारकरी परतीच्या प्रवासाला लागले होते़ शहरातून बाहेर जाणारे सोलापूर मार्गावरील तीन रस्ता, कराड नाका, गोपाळपूर रस्ता, करकंब रस्ता, रेल्वे स्टेशन, एस़ टी़ स्टँड आदी ठिकाणांच्या मार्गावरून वारकरी परतीच्या दिशेने निघाल्याचे दिसून आले़ विठुरायापुढे नतमस्तक होण्यापूर्वी स्नान करण्यासाठी चंद्रभागेच्या वाळवंटात भाविकांची दाटी झाली होती़ पहाटेपासून वाळवंट भाविकांनी फुलून गेला होता. टाळ-मृदंगाच्या गजरात विठुनामाचा व ज्ञानोबा-तुकारामचा जयघोष सुरू होता. (प्रतिनिधी)