लाखभर विद्यार्थ्यांवर लातूर सोडण्याची वेळ
By admin | Published: March 28, 2016 03:12 AM2016-03-28T03:12:56+5:302016-03-28T03:12:56+5:30
मराठवाड्यातील दुष्काळ स्थिती दिवसेंदिवस भीषण होत चालली आहे. लातूर, बीड, उस्मानाबाद जिल्ह्यांतील अनेकांनी कामाच्या शोधात गाव सोडले आहे. लातूर जिल्हा प्रशासनाने
- दत्ता थोरे, विशाल सोनटक्के, प्रताप नलावडे ; लातूर, उस्मानाबाद, बीड
मराठवाड्यातील दुष्काळ स्थिती दिवसेंदिवस भीषण होत चालली आहे. लातूर, बीड, उस्मानाबाद जिल्ह्यांतील अनेकांनी कामाच्या शोधात गाव सोडले आहे. लातूर जिल्हा प्रशासनाने १ एप्रिलनंतर शहरातील महाविद्यालये आणि खासगी क्लासेस बंद करण्याचा फतवा काढल्याने ‘लातूर पॅटर्न’मुळे शहरात शिक्षणासाठी आलेल्या परजिल्ह्यातील लाखभर विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांना शहर सोडावे लागणार आहे.
ऊसतोडणी कामगारांचा जिल्हा म्हणून ओळख बनलेल्या बीड जिल्ह्यातून या वर्षी छोट्या शेतकऱ्यांनीदेखील कोयता हाती घेतल्याने स्थलांतर करणाऱ्या ऊसतोड मजुरांची संख्या सहा लाखांवर गेली आहे. सीईटीच्या तयारीसाठी परजिल्ह्यातून सुमारे ७० हजारांहून अधिक मुले आणि त्यांचे पालक लातूर शहरात आहेत. काहींनी फक्त मुलांच्या शिक्षणासाठी घरसुद्धा विकत घेतले आहे. शहरात ७० खासगी व २५ महाविद्यालयांची वसतिगृहे आहेत. १ एप्रिलनंतर महाविद्यालये आणि खासगी क्लासेस बंद करावेत, असा फतवा काढून जिल्हा प्रशासन मोकळे झाले आहे. मुलांना गावी पाठवून महाविद्यालये कशी बंद ठेवायची, असा सवाल सोनवणे महाविद्यालयालयाचे प्रा. संजीव सोनवणे यांनी केला आहे.
उस्मानाबादेत कारखाने बंद
जिल्ह्यात १७पैकी ७ कारखान्यांनीच गाळप हंगाम घेतला. त्यामुळे हजारो कर्मचाऱ्यांच्या हाताला काम नाही. सीना-कोळेगाव हा प्रकल्प कोरडा पडला आहे. या धरणाच्या पायथ्याशी असलेल्या बागायतदार कुटुंबांनी आता कामासाठी बाहेरगावचा रस्ता धरला आहे. विद्यार्थीगळतीचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे. दरवर्षी साधारणत: पाच ते सात टक्के विद्यार्थी परीक्षा देत नसल्याचे दिसून येत होते. मात्र, या वर्षी हे प्रमाण तब्बल २२ टक्क्यांवर पोहोचले आहे. पाच हजार विद्यार्थ्यांनी यंदा परीक्षा शुल्कच भरले नव्हते, अशी माहिती डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ उपकेंद्राचे संचालक डॉ. अशोक मोहेकर यांनी दिली.
नांदेडमध्ये विद्यार्थ्याचा ‘पाणीबळी’
पाणी घेण्यासाठी टँकरवर चढताना खाली पडून टायरखाली आल्याने
१३ वर्षीय शाळकरी विद्यार्थी नवनाथ गोविंद बागल जागीच ठार झाल्याची घटना नांदेड तालुक्यातील काकांडी येथे रविवारी दुपारी घडली. नवनाथच्या शरीरावरून टँकरचे मागचे चाक गेले. काकांडी येथील पाणीपुरवठा योजना १५ ते २० वर्षांपासून बंदच असल्याने पाण्याचा प्रश्न गंभीर झाला आहे.
लातूरमध्ये 750 उद्योग बंद
लातूर जिल्ह्यात औद्योगिक वसाहतीतील ७५० उद्योग पाण्याअभावी बंद पडले आहेत. त्यामुळे या उद्योगातील मजुरांसह हमाल आणि शेतमजूर व अल्पभूधारक शेतकरी कुटुंबांनी स्थलांतराचा पर्याय निवडला. जिल्ह्यातील ९४५पैकी निम्म्यांहून अधिक गावांतील लोकांनी पुणे-मुंबईसह औरंगाबाद, नाशिक व कोल्हापूरचा रस्ता धरला आहे.
बीडमधून मजुरांचे स्थलांतर
बीड जिल्ह्यातून राज्यातील साखर कारखान्यांसह कर्नाटक आणि आंध्र प्रदेशातील कारखान्यांवर ऊसतोडणी मजूर जातात. शिरूर, पाटोदा, आष्टी, धारूर, केज या तालुक्यांतून सर्वाधिक मजुरांचे स्थलांतर दरवर्षी होत असते. यंदा दुष्काळामुळे छोट्या शेतकऱ्यांवरही ऊसतोडणी मजूर म्हणून गाव सोडण्याची पाळी आली आहे. बीड जिल्ह्यातील सहापैकी चार साखर कारखान्यांचे बॉयलर यंदा पेटलेले नाहीत. त्यामुळे स्थलांतरित होणाऱ्या ऊसतोडणी मजुरांची संख्या वाढली आहे.