राज्यातील विद्यापीठांची लाखोंची उधळपट्टी
By admin | Published: February 26, 2017 12:54 AM2017-02-26T00:54:48+5:302017-02-26T00:54:48+5:30
कुसुमाग्रज यांचा जन्मदिवस मराठी भाषा दिन म्हणून साजरा करण्यात येत आहे. मात्र, यात उच्च शिक्षण विभागाने एक रुपयाही न देता विद्यापीठांनी विद्यार्थ्यांकडून गोळा
- राम शिनगारे, औरंगाबाद
कुसुमाग्रज यांचा जन्मदिवस मराठी भाषा दिन म्हणून साजरा करण्यात येत आहे. मात्र, यात उच्च शिक्षण विभागाने एक रुपयाही न देता विद्यापीठांनी विद्यार्थ्यांकडून गोळा केलेल्या फंडातूनच लाखोंची उधळपट्टी करण्याचा निर्णय घेतला आहे. विशेष म्हणजे कार्यक्रम विद्यापीठांचा आणि कलाकार, साहित्यिक ठरविण्याचे अधिकार खाजगी इव्हेंट एजन्सींना देण्यात आल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.
राज्य उच्च शिक्षण विभागाने मागील पंधरवड्यात अकृषी विद्यापीठांच्या उच्चस्तरीय अधिकाऱ्यांची संयुक्त बैठक घेऊन मराठी भाषा दिन उत्साहात साजरा करण्याचे आदेश दिले. मुंबई येथे झालेल्या बैठकीत प्रत्येक विद्यापीठांना २७ फेब्रुवारी रोजी विशेष कार्यक्रमांसह भाषा सप्ताह साजरा करण्याच्या सूचना देण्यात आल्या. यासाठी प्रत्येक विद्यापीठाने सरासरी २० लाख रुपयांचा खर्च करण्याची तयारी ठेवण्यास सांगण्यात आले.
यात मराठी भाषादिनी विनाटेंडर ठरवून दिलेल्या इव्हेंट कंपन्या सांगतील तोच कार्यक्रम विद्यापीठांनी घेण्याची सक्ती करण्यात आली. यासाठी प्रत्येक विद्यापीठाला वेगवेगळी कंपनी ठरवून देण्यात आली. विद्यापीठांनी मान्य केलेल्या पॅकेजनुसार मराठी भाषा दिनाचे कार्यक्रम आणि कलाकार कंपन्यांनी ठरविले आहेत. यात तीन तासांच्या कार्यक्रमांसाठी विद्यापीठांना विद्यार्थ्यांच्या शुल्कातून लाखो रुपये संबंधित इव्हेंट कंपन्यांना द्यावे लागत असल्याची माहिती सूत्रांनी दिली. याविषयी उच्चशिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही. (प्रतिनिधी)
माय मराठीचा उत्सव रंगणार
नांदेड येथील स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठात ‘माय मराठीचा उत्सव’ हा लक्ष्मीकांत धोंड यांच्या टीमचा कार्यक्रम होणार आहे. तर अमरावतीच्या संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठात नागपूरच्या जीआर इमेजेसनिर्मित अभिनेत्री केतकी माटेगावकर व गायक चैतन्य कुलकर्णी यांच्या सहभागासह ६० कलावंतांचा कार्यक्रम होणार आहे. यासारखेच कार्यक्रम जळगाव, पुणे, नाशिक, मुंबई, नागपूर आदी सर्व अकृषी विद्यापीठांमध्ये आयोजित करण्यात आले आहेत.
औरंगाबादेतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात मुंबईतील मिती क्रिएशनने भाषा दिनाचा कार्यक्रम ठरविला आहे. तीन तासांच्या कार्यक्रमात अभिनेता सचिन खेडेकर, सोनाली कुलकर्णीसह इतर कलाकार ‘आत्मवाणी-अमृतवाणी’ कार्यक्रमाचे सादरीकरण करणार आहे. यासाठी विद्यापीठ मिती क्रिएशनला साडेदहा लाख रुपये देणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.