लक्ष्मणरेषा थांबली!

By admin | Published: January 28, 2015 05:06 AM2015-01-28T05:06:32+5:302015-01-28T05:06:32+5:30

धोतर आणि चौकडीचा कोट, डोक्याला टक्कल, नाक फुगीर, आखूड मिशा आणि डोळ्यावर चष्मा असणारा आणि चेहऱ्यावर भांबावलेले भाव असलेला माणूस

Lakshmanyhara stopped! | लक्ष्मणरेषा थांबली!

लक्ष्मणरेषा थांबली!

Next

विकास सबनीस, (लेखक ज्येष्ठ व्यंगचित्रकार आहेत.)
धोतर आणि चौकडीचा कोट, डोक्याला टक्कल, नाक फुगीर, आखूड मिशा आणि डोळ्यावर चष्मा असणारा आणि चेहऱ्यावर भांबावलेले भाव असलेला माणूस. कॉमन मॅन. हे चित्र भारतातील कोट्यवधी मूक जनतेचे प्रातिनिधिक चित्र होते. अवतीभोवती घडणाऱ्या घटनांचा तो मूक साक्षीदार असायचा. या व्यंगचित्राने गेली कित्येक वर्षे सामान्य लोकांच्या भावनांना वाट मोकळी करून दिली. आरकेंनी काळानुसार या ‘कॉमन मॅन’मध्येही स्थित्यंतरे घडवून आणली, तोही बदलला. नेहरूंचा काळ ते एकविसाव्या शतकापर्यंतच्या ‘कॉमन मॅन’मध्ये आरकेंनी काळानुरूप बदल केले. आरकेंच्या कलाकृती अजरामर आहेतच; पण त्यातल्या नेमक्या कोणत्या सर्वोत्कृष्ट, हे सांगणेही तितकेच कठीण आहे. तरीही सत्तरीच्या दशकात भारत-पाकिस्तान युद्ध संपल्यानंतर आरकेंनी युद्धावर उपहासात्मक भाष्य करणारे चित्र रेखाटले होते़ ते चित्र म्हणजे पाकला चपराकच होती. तसेच इंदिरा गांधींच्या राजवटीत राष्ट्रपतींवर मार्मिक भाष्य करणाऱ्या आरकेंनी रेखाटलेले चित्र हे समाजाचे प्रतिबिंब होते.
आरकेंची विषयाची हाताळणी, विनोदबुद्धी, रेखाटन कौशल्य वेगळेच होते, अतिशय संयमित़़़ त्यामुळेच चोखंदळ वाचकांना ती व्यंगचित्रे आवडतात. पण या ‘कॉमन मॅन’ने लोकांना इतके जिंकले की, पुढे पुढे आरकेंना टपाल खात्यातील उशीर, सदोष टेलीफोन यंत्रणा, अव्वाच्या सव्वा येणारी विजेची बिले, शाळेतील भ्रष्टाचार याविषयी तक्रार करणारी पत्रे येऊ लागली. एका मजेशीर पत्रात म्हटले होते, ‘कृपया ४७ डाऊन ही गाडी अमुक ठिकाणी काही मिनिटे थांबवावी. त्यामुळे आॅफिसातून घरी जाण्यासाठी पुढच्या गाडीची मला चार तास मला वाट पाहावी लागणार नाही़’ बिच्चारा सामान्य माणूस? जीवन जगण्याच्या रोजच्या लढाईत हतबल झालेला असतो. आपल्या समस्येवर कोण उपाय करू शकतो, आपल्या प्रश्नाचे समाधानकारक उत्तर कोण देऊ शकते, याचे व्यासपीठ कॉमन मॅन शोधत असतो. आश्चर्य म्हणजे या लोकशाहीच्या दरबारात त्याला प्रशासनापेक्षा, राज्यकर्त्यांपेक्षा कलाकाराबद्दल जास्त विश्वास वाटतो.
समाजातील प्रत्येक घटकातील विसंगती शोधणाऱ्या आरकेंना त्यांच्या आयुष्यातील विसंगतीबद्दल एकदा विचारण्यात आले; तेव्हा ते हसत म्हणाले, ‘‘हो, मला जे. जे. स्कूल आॅफ आर्ट्समध्ये प्रवेश नाकारण्यात आला होता व कालांतराने जे.जे.मध्ये चित्रकारांपुढे रेषांची रेखाटने व शैलीबद्दल लेक्चर देण्यासाठी निमंत्रित केले होते.’’ आर. के. लक्ष्मण यांच्या स्मृती जपण्यासाठी पुण्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांचे स्मारक उभारण्याची घोषणा केली; मात्र त्यांचा पुतळा उभारून आठवणी जपणे चुकीचे ठरेल. कारण स्वत: आरकेंनी स्मारके, पुतळे यांना विरोध दर्शवणारी, त्यावर भाष्य करणारी व्यंगचित्रे वेळोवेळी रेखाटली आहेत. त्यामुळे त्यांचा पुतळा उभारणे त्यांना कदापि आवडले नसते. त्याऐवजी ‘आर. के. लक्ष्मण स्कूल आॅफ कार्टूनिंग’ अशी एखादी संस्था सुरू करून नव्या पिढीला व्यंगचित्र विश्वाचे धडे देणे, हीच त्यांना खरी आदरांजली ठरेल, हे निश्चित.

 

Web Title: Lakshmanyhara stopped!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.