लक्ष्मीपूजनासाठी सूर्यास्तानंतरचे अडीच तास सर्वोत्तम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 19, 2017 03:33 AM2017-10-19T03:33:26+5:302017-10-19T03:33:54+5:30
लक्ष्मीपूजनासाठी उद्या (गुरुवारी) दुपारी ४.४५ ते ८.४०, रात्री ९.३५ ते ११.५५ हा चांगला तर सूर्यास्तानंतरचा अडीच तासांचा मुहूर्त सर्वोत्तम आहे.
पुणे : लक्ष्मीपूजनासाठी उद्या (गुरुवारी) दुपारी ४.४५ ते ८.४०, रात्री ९.३५ ते ११.५५ हा चांगला तर सूर्यास्तानंतरचा अडीच तासांचा मुहूर्त सर्वोत्तम आहे. या कालावधीत व्यापारी वर्गासह घरोघरी कुबेराचे पूजन करावे, असे आवाहन दाते पंचागकर्ते मोहन दाते यांनी केले आहे.
आश्विन वद्य अमावास्येला संध्याकाळी घरोघरी, दुकानांतून सोन्या-चांदीच्या पेढ्यातून, आॅफिसातून लक्ष्मीपूजन केले जाते. घरातील सोनंनाणं-रोकड यांची पूजा करतात. व्यापारी सर्व हिशेबाच्या वह्यांचे पूजन करतो. या धनलक्ष्मीच्या पूजनाबरोबरच त्या दिवशी आरोग्यलक्ष्मी (केरसुणी) हिचीपण पूजा केली जाते. व्यापारी लोकांचे हिशोबाचे नवीन वर्ष लक्ष्मीपूजनानंतर सुरू होते. पाटावर रांगोळी काढून तांदूळ ठेवतात. त्यावर वाटी किंवा तबक ठेवतात. त्यात सोन्याचे दागिने, चांदीचा रुपया, दागिने ठेवून त्यांची पूजा करतात. या दिवशी स्वच्छता करण्यासाठी लागणारी नवी केरसुणी विकत घेतात. तिलाच लक्ष्मी मानून तिच्यावर पाणी घालून हळद-कुंकू वाहून घरात वापरण्यास सुरुवात करतात. लक्ष्मीपूजनानंतर फटाक्यांची आतषबाजी करून आनंद साजरा केला जातो. लक्ष्मीपूजनासाठी साहित्य खरेदी करण्यासाठी बुधवारी सायंकाळी बाजारपेठेत गर्दी झाली होती. झेंडूची फुले, केरसुणी, लाही बत्तासे यांची खरेदी करताना महिला दिसत होत्या. यादिवशी गोडधोड करण्याची प्रथा असल्याने मिठाईच्या दुकानाबाहेर रांगा होत्या.
लक्ष्मीपूजन मुहुर्त :
- आज दुपारी ४.४५ ते ८.४०
- रात्री ९.३५ ते ११.५५