फकिराघरचे लक्ष्मीपूजन!

By admin | Published: November 12, 2015 11:57 PM2015-11-12T23:57:44+5:302015-11-12T23:57:44+5:30

आयुष्यभर फकिराचं जीवन जगलेल्या साईबाबा संस्थानची झोळी जगभरातील लाखो भाविकांच्या दातृत्वामुळे भरली आहे

Lakshmi Pujan of Fakiraghara! | फकिराघरचे लक्ष्मीपूजन!

फकिराघरचे लक्ष्मीपूजन!

Next

प्रमोद आहेर, शिर्डी
आयुष्यभर फकिराचं जीवन जगलेल्या साईबाबा संस्थानची झोळी जगभरातील लाखो भाविकांच्या दातृत्वामुळे भरली आहे.शिर्डीतील फकिराच्या घरी साक्षात लक्ष्मीची पावलं उमटल्यामुळे बाबांच्या नावाने सुरू करण्यात आलेले संस्थानही करोडपती बनले आहे़
येथील धनलक्ष्मीची बुधवारी प्रथेप्रमाणे पारंपरिक पद्धतीने पूजा करण्यात आली़ बाबांच्या मूर्तीवर दीड कोटींच्या हिरेजडीत सुवर्ण मुकूटासह कोट्यवधींची आभूषणे घालण्यात आली होती़ संस्थानचे कार्यकारी अधिकारी बाजीराव शिंदे यांनी लक्ष्मीपूजन केले.
शिर्डी देवस्थान आज करोडपती बनले आहे़ संस्थानची स्थापना झाल्यावर २८ मे १९२३ रोजी संस्थानने काही तुटलेली तांब्या, पितळेची भांडी व चांदीच्या दोन ताटल्या मोडून बाबांच्या आरतीसाठी तबक बनवले होते़ आज मात्र बाबांचे सिंहासन व मंदिराच्या शिखरासह रोजच्या पूजेतील वापराच्या जवळपास सर्वच वस्तू सोन्याच्या आहेत़
गेल्या ९२ वर्षांतील संस्थानचा ताळेबंद आश्चर्यकारक आहे़ १९२३ साली संस्थानचे इंपेरियल बँकेच्या बचत खात्यात केवळ १,४४५ रुपये ७ आणे व ६ पैसे होते़ आज पंधरा राष्ट्रीयीकृत बँकांमध्ये संस्थानचे १,४८३ कोटी रुपये ठेवीच्या स्वरुपात आहेत़ यंदा ठेवींवर संस्थानला निव्वळ व्याजापोटी ९९ कोटी रुपये मिळाले़ संस्थानची सध्याची स्थावर मालमत्ता पाचशे कोटींवर आहे़ याशिवाय वापरातील सोन्यासह जवळपास ३८० किलो सोने व चार हजार किलो चांदी आणि सात कोटींची हिरेमाणके तिजोरीत आहेत़
भाविकांच्या दानातून येथे अल्पदरात अन्नछत्र चालवले जाते़ शाळा, रुग्णालये, नागरी सुविधा व शासनालाही मदत याच फकिराच्या झोळीतून करण्यात येते़ बाबांची झोळी ऐश्वर्यसंपन्न बनली असली तरी समाधी शताब्दीच्या उंबरठ्यावर मंदावलेली विकासकामे, भाविकांची रोडावलेली संख्या व शहराचे बिघडलेले अर्थकारण चिंतेची बाब आहे़

Web Title: Lakshmi Pujan of Fakiraghara!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.