लक्ष्मीच्या पावलांनी लेकीचे स्वागत

By Admin | Published: October 27, 2015 12:01 AM2015-10-27T00:01:40+5:302015-10-27T00:04:52+5:30

राज्यात पहिला उपक्रम : मुलगी झाल्यास प्रसूती मोफत, चांगला प्रतिसाद

Laksmi's steps are welcome | लक्ष्मीच्या पावलांनी लेकीचे स्वागत

लक्ष्मीच्या पावलांनी लेकीचे स्वागत

googlenewsNext

भीमगोंडा देसाई -- कोल्हापूर येथील जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाच्या ‘लक्ष्मीचे पाऊल’ उपक्रमामुळे ‘बेटी बचाओ’ चळवळीला बळ मिळत आहे. मुलगी झाल्यास मोफत प्रसूती सेवा दिली जात आहे. त्यामुळे जिल्ह्यात या चळवळीला चांगला प्रतिसाद मिळत आहे. अशा प्रकारचा उपक्रम राबविणारी कोल्हापूर जिल्हा परिषद ही राज्यातील पहिली असल्याचा दावा प्रशासनाने केला आहे. ‘मुलगाच वंशाचा दिवा’ या भ्रामक समजुतीमुळे स्त्री-भ्रूणहत्येचे प्रमाण वाढते आहे. त्यामुळेच मुलींची संख्या कमी होत आहे. समाजात त्याचा गंभीर परिणाम जाणवत आहे. सर्वच घटकांतून ‘मुलगी वाचवा’ अभियान राबविले जात आहे. विविध प्रकारे मुलींच्या जन्माचे स्वागत केले जात आहे. शासन व प्रशासनाच्या स्तरावरून जाणीवपूर्वक, नियोजनबद्धरीत्या विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. सेव्ह द बेबी गर्ल, बेटी बचाओ-बेटी पढाओ या अभियानांतर्गत जागृृती केली जात आहे. ‘लेक वाचवा’ अभियानांतर्गत मुलींंच्या जन्माचे प्रमाण वाढविण्यासाठी रुग्णालयीन प्रसूतीचे प्रमाण वाढविणे, बालमृत्यू, मातामृत्यूचे प्रमाण कमी करणे यासाठी कोल्हापूर जिल्हा परिषदेतर्फे दोन महिन्यांपासून ‘लक्ष्मीचे पाऊल’ हा उपक्रम राबविला जात आहे. या उपक्रमातून वैद्यकीय सेवा देण्यासाठी जिल्ह्यातील आठ रुग्णालयांची निवड केली आहे. संबंधित रुग्णालयात नैसर्गिक प्रसूतीद्वारे मुलगी झाली तर सर्व सेवा मोफत आहेत. मुलगा झाला तर फक्त एक हजार रुपये शुल्क आकारण्यात येते. सिझेरियन शस्त्रक्रिया झाल्यास औषधे व सर्व उपचारांसह ४ हजार ५०० रुपये घेतले जातात. जननी सुरक्षा योजनेतील लाभार्थ्यांना मोफत वाहनसेवा देण्यात येते. जोखमीच्या गरोदर मातांना व बालकांवर आवश्यक उपचार केले जातात. उपक्रम सुरू झाल्यानंतर आॅगस्ट, सप्टेंबर महिन्यांत ७५ प्रसूती झाल्या. यापैकी १२ नैसर्गिक, ६२ सिझेरियन, गुंतागुंतीच्या एक अशा शस्त्रक्रियेचा समावेश होता. १२ लाख ९२ हजारांची बचत सिझेरियन शस्त्रक्रियेसाठी सध्या २५ हजार रुपये घेतले जातात. याप्रमाणे या उपक्रमांतर्गत झालेल्या प्रसूतीसाठी १५ लाख ७५ हजार रुपयांचा खर्च होऊ शकला असता. तथापि, या उपक्रमातून निवड केलेल्या रुग्णालयांत या शस्त्रक्रिया २ लाख ८३ हजार रुपयांमध्ये झाल्या आहेत. तब्बल १२ लाख ९२ हजार रुपयांची बचत झाली आहे. जिल्ह्यात मुलींचा जन्मदर वाढावा यासाठी आरोग्य विभागातर्फे ‘लक्ष्मीचे पाऊल’ हा उपक्रम राबविला जात आहे. त्याला चांगला प्रतिसाद मिळत आहे. उपक्रमांतर्गत निवडलेल्या रुग्णालयांत उपचार घेतल्यामुळे प्रसूतीसाठीचे पैसे वाचत आहेत. - अविनाश सुभेदार, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ)

Web Title: Laksmi's steps are welcome

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.