मित्रपक्षांना ‘लालदिवा’? शक्यता कमीच!
By admin | Published: June 13, 2016 05:44 AM2016-06-13T05:44:09+5:302016-06-13T07:12:29+5:30
मंत्रिमंडळाच्या संभाव्य विस्तारात राष्ट्रीय समाज पक्ष, स्वाभिमानी शेतकरी संघटना आणि शिवसंग्राम या मित्रपक्षांचा समावेश होण्याची शक्यता कमी
यदु जोशी,
मुंबई- राज्य मंत्रिमंडळाच्या संभाव्य विस्तारात राष्ट्रीय समाज पक्ष, स्वाभिमानी शेतकरी संघटना आणि शिवसंग्राम या मित्रपक्षांचा समावेश होण्याची शक्यता कमी असल्याचे सूत्रांनी सांगितले.
मंत्रिमंडळाचा विस्तार २० ते २५ जून दरम्यान होण्याची शक्यता आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या विस्तारास पक्षश्रेष्ठींकडून परवानगी मिळविली आहे. मात्र, या विस्तारात रासपचे महादेव जानकर, शिवसंग्रामचे विनायक मेटे, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे सदाभाऊ खोत वा रिपाइंपैकी कोणालाही मंत्रिमंडळात स्थान देऊ नये, असे पक्षाच्या राष्ट्रीय नेतृत्वाचे मत असल्याचे समजते. खोत आणि मेटे यांना विधान परिषदेची आमदारकी देण्यासही भाजपा श्रेष्ठी अनुकूल नव्हते, पण मुख्यमंत्री आणि राज्यातील काही भाजपा नेत्यांनी वारंवार विनंती केल्यानंतर त्यांच्या नावाला वरून हिरवा झेंडा मिळाला होता. मित्रपक्षांना मंत्रिपदे द्यावीत, असे मुख्यमंत्र्यांचे मत आहे, पण श्रेष्ठींचा विरोध कायम राहिल्यास ते शक्य होणार नाही. मंत्रिपदाऐवजी त्यांची वर्णी महामंडळावर लागू शकते. मराठा आरक्षणासाठी संघर्ष करणारे छत्रपती संभाजी राजे यांची राज्यसभेवर झालेली निवड, धनगर समाजाचे असलेले डॉ. विकास महात्मे यांना राज्यसभेवर दिलेली संधी लक्षात घेता, मराठा, धनगर अशा मोठ्या समाजांमध्ये स्वत:चा प्रभाव निर्माण करण्याची भाजपाची तयारी सुरू झाली आहे. त्यामुळे लहान मित्रपक्षातील मराठा, धनगर नेत्यांना मंत्रिपदे देण्याबााबत भाजपा नेतृत्व उत्सुक नाही.
>नाशिक जिल्ह्याला मिळेल स्थान
मंत्रिपदासाठी भाजपामध्येच इच्छुकांची मोठी गर्दी आहे. संभाव्य मंत्र्यांमध्ये जयकुमार रावळ, संभाजी पाटील निलंगेकर, सुभाष देशमुख ही नावे पक्की मानली जातात. या शिवाय, नाशिक जिल्ह्याला या मंत्रिमंडळात पहिल्यांदाच स्थान दिले जाईल.
>महिला कोटाही वाढविला जाऊ शकतो.
विस्तारामध्ये शिवसेना सहभागी झाल्यास अर्जुन खोतकर आणि गुलाबराव पाटील यांच्या गळ्यात मंत्रिपदाची माळ पडेल. मित्रपक्षांना मंत्रिपदे द्यावीत, असे मुख्यमंत्र्यांचे मत आहे, पण श्रेष्ठींचा विरोध कायम राहिल्यास ते शक्य होणार नाही. मंत्रिपदाऐवजी त्यांची वर्णी महामंडळावर लागू शकते.
पश्चिम विदर्भात मदन येरावार, डॉ. संजय कुटे यांची नावे चर्चेत आहेत. पश्चिम महाराष्ट्रातून एक मराठा व एक बिगर मराठा असे स्थान दिले जाऊ शकते. बंजारा समाजाला स्थान द्यायचे ठरले, तर तुषार राठोड राज्यमंत्री होतील.मंत्रिमंडळ विस्तारामध्येही सामाजिक समीकरण साधण्याचा प्रयत्न भाजपाचा प्रयत्न आहे.