संजय राऊतांमुळेच ललित पाटील शिवसेनेत; ड्रग्ज प्रकरणाचे धागेदोरे तपासा, शिंदे गटाचा दावा
By ऑनलाइन लोकमत | Published: October 21, 2023 10:27 AM2023-10-21T10:27:04+5:302023-10-21T10:27:42+5:30
पोटातील मळमळ वेगळी आहे. काही गोष्टींची त्यांना भीती वाटते. लवकरच बाहेर पडेल. कुठलीही गोष्ट कागदपत्रे, पुरावे याशिवाय बोलणे बरोबर नाही असा इशारा भुसेंनी राऊतांना दिला.
नाशिक – संजय राऊत उत्तर महाराष्ट्राचे नेते असताना नाशिकच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांच्या माध्यमातून ड्रग्जमाफिया ललित पाटील याला उद्धव ठाकरेंच्या हातून शिवबंधन बांधण्याचं काम राऊतांनीच केले असा दावा मंत्री दादा भुसे यांनी केला आहे. पहिल्या दिवसापासून ड्रग्ज विषयात कुणाचे समर्थन असण्याचे प्रश्न उद्भवत नाही. या प्रकरणाच्या खोलात जाऊन चौकशी होणे गरजेचे आहे असंही भुसेंनी सांगितले.
दादा भुसे म्हणाले की, ड्रग्ज प्रकरणाला राजकीय वळण देण्याचा प्रयत्न केला जातोय. ठाकरे गटाने काल मोर्चा काढला. मोर्चात सहभागी लोकं कशासाठी आलेत हे त्यांना माहिती नाही हे माध्यमांनीच दाखवले. ठाकरे गटाची दुखणी वेगळी आहेत. त्यांची दुखणी लवकरच जनतेसमोर येतील. पोटातील मळमळ वेगळी आहे. काही गोष्टींची त्यांना भीती वाटते. लवकरच बाहेर पडेल. कुठलीही गोष्ट कागदपत्रे, पुरावे याशिवाय बोलणे बरोबर नाही असा इशारा त्यांनी दिला.
ललित पाटलाचे धागेदोरे संजय राऊतांपर्यंत...
त्याचसोबत ललित पाटीलाचे धागेदोरे संजय राऊतांपर्यंत आहेत. त्याचा तपास केला पाहिजे. कारण हाच ललित पाटील याने मातोश्री उद्धव ठाकरेंच्या हातून शिवबंधन बांधले. त्याला यांनी शहरप्रमुख केला. आज संजय राऊत मोर्चा काढतायेत. पण याच ललित पाटीलला ड्रग्जचा धंदा करण्यासाठी तुम्ही कवच कुंडल दिली. तुम्ही त्याला पक्षात घेतले नसते तर हा धंदा केला असता का असा सवाल आमदार संजय गायकवाडांनी केला आहे.
संजय राऊतांचा आरोप
ललित पाटील यांच्या मैत्रिणी विधानसभेपर्यंत आहेत. त्यांना इथून हफ्ता जात होता. हे आकडे महिन्याला १०-१५ लाखांचे आहे. सत्तेतील आमदार यात सहभागी आहेत. मंत्र्यांवर आरोप झालेत, पोलिसांवर आरोप आहेत. त्यांनी शिवसेनेने मोर्चाची घोषणा करताच कारवाईला सुरुवात केली. हा मोर्चा आम्ही हाती घेतल्यावर पानटपऱ्यांवर धाडी पडल्या. नाशिक आणि मालेगावपर्यंत ड्रग्जचा व्यापार केवळ एका दोघांच्या नियंत्रणाखाली नसून त्याचे धागेदोरे गुजरात, इंदूरपर्यंत पोहचले आहेत. गुजरातच्या ड्रग्जचे धागेदोरे पाकिस्तान, अफगाणिस्तानपर्यंत पोहचलेत हे सगळ्यांना माहिती आहे. तरुणपिढीला ड्रग्जच्या विळख्यात ओढले जातंय असा आरोप राऊतांनी केला.