ललित पाटीलचा एन्काऊंटर होऊ शकतो; ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांचा दावा
By ऑनलाइन लोकमत | Published: October 27, 2023 01:11 PM2023-10-27T13:11:04+5:302023-10-27T13:11:42+5:30
वार्ड नंबर १६ मध्ये ललित पाटीलवर उपचार करणारे डॉक्टराचे नाव SST म्हणजे संजीव श्याम ठाकूर हे नाव येणे हे धक्कादायक आहे असं सुषमा अंधारे यांनी म्हटलं.
पुणे – ड्रग्ज प्रकरणी अटकेत असलेल्या ललित पाटीलचा एन्काऊंटर अथवा संशयास्पद मृत्यू होऊ शकतो असा दावा ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी केला आहे. सध्या कशावरच विश्वास ठेवायला नको. तपासात ललित पाटीलच्या जीविताचे रक्षण करणे हेदेखील मोठे आव्हान असेल असंही अंधारे यांनी म्हटल्याने राजकीय वर्तुळात खळबळ माजली आहे.
सुषमा अंधारे म्हणाल्या की, गेल्या दीड महिन्यापासून ललित पाटील प्रकरणाचा आम्ही पाठपुरावा करतोय. राज्याच्या तरुणाईला वाचवणे आणि त्यांचे भवितव्य सुरक्षित ठेवणे हा आमचा हेतू आहे. ससूनसारख्या ठिकाणी २ कोटींचे ड्रग्ज सापडणे हे अत्यंत चिंताजनक आणि धक्कादायक आहे. त्यामुळे ससूनमधील काही लोकांचीही चौकशी होणे गरजेचे आहे. चौकशीत ससूनचे डीन यांचा समावेश होता. कैदी रुग्ण हॉस्पिटलला येत असेल तर कारागृह अधीक्षक आणि त्यांच्या हाताखाली काम करणाऱ्यांकडे माहिती असेल. ती माहिती आधी डीनपर्यंत येत असेल या सगळ्यांची चौकशी व्हावी असं सातत्याने सांगतोय त्यांनी म्हटलं.
तसेच वार्ड नंबर १६ मध्ये ललित पाटीलवर उपचार करणारे डॉक्टराचे नाव SST म्हणजे संजीव श्याम ठाकूर हे नाव येणे हे धक्कादायक आहे. आतातरी गृहमंत्री संजीव ठाकूर यांना सहआरोपी करणार आहे का? कारण संजीव ठाकूर यांना आरोपी करून त्यांची नार्कोटेस्ट करायला हवी. जेवढे कैदी रुग्ण आहेत त्यात विनय हरा आहे जो पळून गेला त्याचाही उपचार संजीव ठाकूर करतायेत. तरुणाईला ड्रग्जच्या विळख्यातून बाहेर काढायचे असेल तर संजीव ठाकूरला अटक व्हायला हवी. ललित पाटीलला जेव्हा दाखल केले तेव्हा त्याच्या तोंडाला फेस आल्याचे सांगितले. सातत्याने त्याचा रुग्णालयातील अधिवास जास्त वाढवण्यासाठी संजीव ठाकूर यांनी प्रयत्न केले असा आरोप सुषमा अंधारे यांनी केला.
दरम्यान, हॉटेल लेमन ट्रीमधील ललित पाटीलचे वास्तव्य, त्या हॉटेलचे सीसीटीव्ही अजूनही बाहेर येत नाही. त्याच लेमन ट्रीमध्ये देवेंद्र फडणवीसांची एक बैठक पार पडली होती. लेमन ट्री हॉटेल, ससून रुग्णालय यांचा तपास जलदगतीने चालत नाही त्यावरून शंका उपस्थित होते. डीन खोटे बोलत असेल तर ही मोठी साखळी आहे. या प्रकरणाची संबंधित सर्व राजकीय लोकांची चौकशी व्हायला हवी. डीनलाच काही कमिशन मिळत होते का? जे काही असेल स्पष्ट व्हायला हवे अशी मागणी सुषमा अंधारे यांनी केली.